Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 03:06 PM2022-07-11T15:06:53+5:302022-07-11T15:24:10+5:30
भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. आईचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला तर मुलगी बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.
हिंगणा (नागपूर) : शहरातील भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. आईचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला तर मुलीचा पत्ता अद्याप लागला नसून शोधकार्य सुरू आहे. सुकवण मात्रे (४५) असे मृत आईचे नाव तर अंजली मात्रे (१७) असे मुलीचे नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात पावसाने धुमाकुळ घातलाय. जून महिन्यात जिथे पाऊस पडत नव्हता म्हणून नागरिक आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, जुलै महिना सुरू होताच पावसाने थैमान घातले. नागपूरमध्ये काल दिवसभर दमदार पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक सखल भागांत पाणी शिरले. परिणामी नागरिकांची तारांबळ उडाली. माहितीनुसार हिंगण्यातील भीमनगर इसासनीच्या नाल्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. दरम्यान सुकवन आणि मुलगी अंजली या घराबाहेर पडल्या असता तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या असाव्यात असा अंदाज लावला जात आहे.
पावसाचा हाहाकार; पुरात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश
दोघीजणी वाहत गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी, आईचा मृतदेह रात्री उशीरा घरापासून जवळपास एक किलोमीटरवर आढळून आला तर, मुलीचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विदर्भात दोन दिवसांत ११ जणांचा बुडून मृत्यू
विदर्भात गेल्या दोन दिवसांमध्ये पुराच्या पाण्यात बुडून आणि वाहून जाण्याच्या विविध घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेतील चार ते पाच तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रविवारी पुरात वाहून गेलेल्या ट्रकमधील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. जिकडेतिकडे पूरस्थिती असल्याने पुलांवरून पाणी वाहत असून, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.