नागपुरात आई, वडील व मुलाने हरविले कोरोनाला : मेडिकलमधून मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 08:03 PM2020-04-14T20:03:37+5:302020-04-14T20:05:16+5:30
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, वडिलांना पक्षाघात झाला होता. त्या स्थितीतही त्यांनी कोरोनाशी लढा दिला. यात त्यांना मेडिकलच्या डॉक्टरांची मोठी मदत झाली.
नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी ५६ झाली. गेल्या तीन दिवसांत २७ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. असे असताना तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-१९’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रुग्णालयातून सुटी झालेल्या ४५ वर्षीय वडिलांचा संपर्क त्याच्या कोरोनाबाधित भावाकडून झाला होता. त्याचा भाऊ बाधित रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. वडिलांचे नमुने २९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आले. यामुळे त्यांची ४४ वर्षीय पत्नी व १४ वर्षीय मुलाचे नमुने तपासले असता ३० मार्च रोजी दोघेही पॉझिटिव्ह आले. या तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. भरतीच्या सातव्या दिवशी व १४ दिवसांनंतर २४ तासांच्या कालावधीत तपासलेले तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या दरम्यान, आई-वडील व मुलाने त्यांना सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या रुग्णसेवेची प्रशंसा केली. डॉक्टरांचे उपचार, त्यांनी दिलेले हिमतीचे बळ आणि आपल्याला बरे व्हायचे आहे, ही सकारात्मक वृत्ती ठेवल्याने आजारातून बरे झालो, असेही त्यांचे म्हणणे होते. तिघांना रुग्णालातून घरी नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. तिघेही कोरोनामुक्त झाले असले तरी पुढील १४ दिवस त्यांना घरीच राहावे लागणार आहे.