चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून जन्मदात्रीचे पलायन; रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आढळल्या दोन बहिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 05:55 PM2022-05-31T17:55:04+5:302022-05-31T18:00:51+5:30
पोलिसांनी फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली व कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना खासगी बालगृहात दाखल केले.
नागपूर : दोन चिमुकल्यांना वाऱ्यावर सोडून त्यांची जन्मदात्री निघून गेली. आता या घटनेला पाच दिवस झाले. अवघ्या दीड आणि तीन वर्षे वय असलेल्या या दोघी निट बोलू शकत नाही अन् आईवडील अथवा ईतर नातेवाईकांबाबत माहितीही देऊ शकत नाही. मात्र, खुद्द आईनेच त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याने त्या दोघी बहिणी कावऱ्याबावऱ्या झाल्या आहेत.
२६ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता दीड वर्षांची पिंकी तसेच तीन वर्षांची किर्ती येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सैरभैर अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना दिसल्या. सदस्यांनी त्यांच्या जवळ जाऊन आईवडिलांबाबत विचारणा केली असता त्या व्यवस्थीत माहिती देऊ शकल्या नाही. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी त्यांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात (जीआरपी) आणून सोडले. पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटावर या दोन मुलींच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांकडे विचारपूसही केली. मात्र, त्यांची माहिती पोलिसांना उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी नंतर फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात एक महिला या दोन मुलींना फलाटावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले. ही महिला कोण, कुठली आणि ती कुठे आहे, ते स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी या दोन मुलींना श्रद्धानंदपेठेतील खासगी बालगृहात दाखल केले.
पोटच्या मुलींना तिने असे बेवारस का सोडले ?
सीसीटीव्हीत दिसणारी महिला अत्यंत गरिब कुटुंबातील दिसते. रस्त्याच्या बाजुला फुटपाथवर अथवा अशाच कोणत्याही ठिकाणी ती राहत असावी, असा अंदाज प्राथमिक चाैकशीनंतर पोलिसांनी बांधला आहे. मात्र, तिने आपल्या पोटच्या मुलींना असे बेवारस का सोडले, ते स्पष्ट झाले नाही. ती हाती लागल्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. रेल्वे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.