मायलेकाचा भीषण अपघातात मृत्यू : पिकअप वाहनाची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:26 PM2019-06-18T19:26:37+5:302019-06-18T19:28:37+5:30
भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (रामटेक) : भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
राजू नत्थूजी मेहरकुळे (४५) व त्याची आई लीलाबाई नत्थूजी मेहरकुळे (६५) रा दुधाळा (कवडक), ता. रामटेक, अशी मृतांची नावे आहेत. राजू मेहरकुळे हा आपल्या आईसोबत एमएच-४०/एजे-५७२८ क्रमांकाच्या दुचाकीने कार्यक्रमानिमित्त निमखेडा येथे जात होता. दरम्यान रामटेक-नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात नगरधनकडून येणाऱ्या एमएच-४०/एके-०७३६ क्रमाकांच्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचे समोरील चाक अक्षरश: तुटून पडले तर दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा झाला.
अपघातानंतर पिकअप वाहनचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी पिकअप वाहनाचा पाठलाग करून रामटेक-चिचाळा मार्गावर त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
मृत राजू मेहरकुळे हे शेती करायचे. त्यांच्या पश्चात म्हातारे वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा आहेत. मायलेकाच्या अपघाती मृत्यूची वार्ता समजताच दुधाळा गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पिकअप वाहनचालक गोपाल महादेव चौधरी (४२) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकाटे करीत आहेत.