लॉकडाउनमुळे छिंदवाड्यात अडकली आई : मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:00 PM2020-03-26T22:00:37+5:302020-03-26T22:02:07+5:30
मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. या अघटित प्रसंगामुळे आई आणि मुलीचा संपर्क तुटला. आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही या चिंतेमुळे कौटुंबिक कारणासाठी छिंदवाड्याला गेलेली आई भयक्रांत झाली असून मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो फोडत आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. ही परिस्थिती नियंत्रित ठेवून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता ही संचारबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जे घरात आहेत ते घरात आणि जे बाहेर आहेत ते बाहेरच अडकले आहेत आणि याची एकेक उदाहरणे समोर येत आहेत. या लॉकडाऊनमुळे आईमुलीची ताटातूट होण्याचा भीषण प्रसंग पिटेसूर, गोरेवाडा येथील कहार कुटुंबावर ओढवला आहे. राजेश कहार व त्यांची पत्नी सुनंदा कहार हे मूळचे छिंदवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला आलेले हे कुटुंब गोरेवाडाजवळ पिटेसूरच्या हनुमान मंदिराजवळ राहत आहे. त्यांच्यासोबत त्यांची १३ वर्षीय मुलगी कशिश ही सुद्धा राहते. मिळालेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथील एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ६ मार्च रोजी आईवडील छिंदवाड्याला निघाले. सुनंदा यांचा भाऊ जवळच राहतो. मुलीची परीक्षा सुरू असल्याने भावाच्या आसऱ्याने तिला येथेच सोडून ते गावाकडे निघाले. निधनाचे सोपस्कर आटोपून लवकर परत येऊ असा त्यांचा विचार होता. मात्र याच काळात कोरोना विषाणूचे संकट आपल्याही देशावर ओढवले. या संकटाला थोपविण्यासाठी आधी विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मध्य प्रदेशही त्यातील एक. त्यानंतर महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आणि आता तर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
यामुळे जे जिथे आहेत तेथेच अडकले. सुनंदा आणि राजेश कहार हे सुद्धा सध्या छिंदवाड्यात अडकले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुलीशी संपर्क होत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून मुलीशी संपर्कच होत नसल्याने त्यांची चिंता वाढायला लागली. शेजाऱ्यांशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही, या विचाराने छिंदवाड्यात अडकलेले हे कुटुंब भयक्रांत झाले असून मुलीची परिस्थिती जाणण्यासाठी आईने टाहो फोडला आहे. आपल्या मुलीला मानेवाडा येथे राहणाऱ्या तिच्या आजीकडे सुखरूप सोडावे, अशी याचना तिची आई करीत आहे. पोलिसांपर्यंत त्यांची विनंती पोहचावी म्हणून ती धडपड करीत आहे.
गृहमंत्र्यांनी लगेच पोलिसांना दिल्या सूचना
दरम्यान आईचा हा टाहो गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचला. या माहितीची लगेच दखल घेत मुलीला मदत पोहचविण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. आईच्या सांगण्यानुसार मुलीला तिच्या मानेवाडा येथे राहणाऱ्या आजीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.