नागपूर जिल्ह्यात आईची दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:30 PM2018-08-04T23:30:40+5:302018-08-04T23:33:01+5:30
कौटुंबिक कलह टोकाला गेल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईने स्वत: जग कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. गावातील तरुणास दोघांचेही मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसताच खळबळ उडाली. ही हृदयद्रावक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या लोणारा शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक कलह टोकाला गेल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईने स्वत: जग कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. गावातील तरुणास दोघांचेही मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसताच खळबळ उडाली. ही हृदयद्रावक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या लोणारा शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.
अश्विना प्रशांत डडमल (२४) व ओमश्री प्रशांत डडमल (२), रा. लोणारा, ता. भिवापूर अशी या दुर्दैवी आई व चिमुकल्याची नावे आहेत. अश्विना व प्रशांतला चार वर्षांची आराध्या व ओमश्री अशी दोन अपत्ये. अश्विना शुक्रवारी (दि. ३) सकाळी १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर शेजारी टीव्ही पाहण्यासाठी जात असल्याचे पती प्रशांतला सांगून ओमश्रीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. तत्पूर्वी तिने आराध्याला शेजारी पाठविले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास ती घरी परत न आल्याने प्रशांतने शेजारी चौकशी केली. ती व ओमश्री तिथे नसल्याने गावात सर्वत्र शोध घेतला, मात्र थांगपत्ता लागला नाही. ती माहेरी गेली असावी, असे समजून प्रशांतने शोधकार्य थांबविले.
दरम्यान, शनिवारी सकाळी त्या दोघांचेही मृतदेह लोणारा शिवारातील तलाव क्रमांक-१ मध्ये तरंगताना स्थानिक तरुणाला आढळून आले. त्याने याबाबत लगेच प्रशांतला माहिती दिली. त्यांची ओळख पटताच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्यासह भिवापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशांत-अश्विनाचा प्रेमविवाह
प्रशांत व अश्विना दोघेही एकाच गावातील रहिवासी असून, त्यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. प्रशांत ट्रॅक्टरचालक असून, प्रसंगी मजुरीही करतो. प्रशांतचे अश्विनाचे वडील गणपत श्रीरामे यांच्याशी सुरुवातीपासून फारसे पटत नव्हते. त्यामुळे त्यांचे संबंधही तसे तणावाचेच आहे. अश्विनाही तिच्या आईला भेटण्यासाठी वडील घरी नसताना जायची.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अश्विनाचे वडील गणपत कवडूजी श्रीरामे यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अश्विनाच्या सासरची मंडळी तिला त्रास द्यायची. त्या त्रासाला कंटाळून तिने टोकाची भूमिका घेतली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्या आधारे भिवापूर पोलिसांनी पती प्रशांत ऊर्फ परसराम शंकर डडमल (३५), सासरा शंकर भानाराव डडमल (६०) व सासूविरुद्ध भादंवि ४८९ (अ ), ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तो कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.