बाळ दगावल्याने मातेने फोडला हंबरडा
By admin | Published: July 21, 2016 02:10 AM2016-07-21T02:10:34+5:302016-07-21T02:10:34+5:30
रेल्वे प्रवासात एका सहा महिन्यांच्या बाळाने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला.
रेल्वेस्थानकावरील घटना : अनेकांच्या डोळ््यात अश्रू
नागपूर : रेल्वे प्रवासात एका सहा महिन्यांच्या बाळाने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. हावडा-हाफा एक्स्प्रेस नागपूरला येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी या बाळाला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर या बाळाच्या मातेने एकच हंबरडा फोडला. ती बाळाला कुशीत घेऊन ओक्साबोक्सी रडत होती. हे चित्र पाहून तेथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
ओम उदय सरकार (सहा महिने) असे या बाळाचे नाव आहे. तो आपले वडील उदय सरकार आणि आईसोबत रेल्वेगाडी क्रमांक १२९०६ हावडा-हाफा एक्स्प्रेसने (कोच एस-५, बर्थ ६१) हावडा ते मुंबई असा प्रवास करीत होता. बिलासपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या चिमुकल्याची प्रकृती अचानक बिघडली.
रेल्वेच्या डॉक्टरांनी थातूरमातूर पाहणी करून त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. गोेंदिया रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या चिमुकल्याची प्रकृती आणखीनच गंभीर झाली. गाडीतील टीसीने सूचना देऊनही गोंदिया रेल्वेस्थानकावर एकही डॉक्टर या बाळावर उपचार करण्यासाठी आला नाही. त्यामुळे पुन्हा गाडीतील टीसीने नागपूर येथे उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयास सूचना दिली.
लगेच रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. हावडा-हाफा एक्स्प्रेस दुपारी ४.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. आपले बाळ जिवंत नाही असे समजताच मातेच्या पायाखालील वाळू सरकली. तिने ओक्साबोक्सी रडण्यास सुरुवात केली.
रेल्वेत मृत्यू झाल्यामुळे उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करून या बाळाला शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. या चिमुकल्याच्या मातेचा टाहो पाहून रेल्वेस्थानकावर उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. (प्रतिनिधी)