चार मुलींना सन्मानाचे जीवन देणारी आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:20+5:302021-05-09T04:09:20+5:30
नागपूर : सामान्य माणसांचा संघर्ष प्रसिद्धीस येत नसला, तरी जवळच्या माणसांसाठी तो प्रेरणादायी आणि मन भरून आणणारा असतो, तसेच ...
नागपूर : सामान्य माणसांचा संघर्ष प्रसिद्धीस येत नसला, तरी जवळच्या माणसांसाठी तो प्रेरणादायी आणि मन भरून आणणारा असतो, तसेच एक नाव म्हणजे शालिनी रमेश रंगारी यांचेही आहे. त्यांचे कर्तृत्व सांगताना सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गोस्वामी यांचाही ऊर भरून आला. आम्हा चारही बहिणींना सन्मानाचे आणि सुखवस्तू आयुष्य मिळाले, ते केवळ आईच्या संघर्षामुळे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
१९८७-८८ हे वर्ष हाेते. काही कारणाने वडिलांची नाेकरी गमावली आणि आमच्यावर संकटाचे डाेंगर काेसळले. आम्ही चार बहिणी. पुढच्या शिक्षणाचाच नाही, तर मुलींना जगवायचे कसे, ही विवंचना आईसमाेर हाेती. मी सर्वात माेठी बीएससी प्रथम वर्षाला हाेती. त्या पाठाेपाठ तीन लहान बहिणी. मात्र, आईमध्ये कमालीची हिंमत हाेती, जणू येणाऱ्या कठीण काळासाठी ती तयारच हाेती. तिच्या सांगण्यावरून मामाने एक पिकाे फाॅलची मशीन आणून दिली आणि तेव्हापासून तिचे अहाेरात्र झटणे सुरू झाले. घराेघरी जाऊन पिकाे फाॅलसाठी लाेकांना विनंती केली. काम वाढले, तशी तिची मेहनतही वाढली. रात्र रात्र जागून न थकता मशीनवर काम करताना आम्ही आईला पाहिले आहे. त्या काळात सरकारी रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर आमची कूस भागत हाेती. आत्मविश्वास, स्वाभिमानासह तिच्यात आणखी एक गुण हाेता, सुबक एम्रॉयडरी काढण्याचा. त्यामुळे तिचे काम महिलांना आवडायचे. तिने कष्ट केले, पण आमचे शिक्षण बंद पडू दिले नाही.
आईच्या याच संघर्षाच्या जाेरावर आम्ही चारही बहिणी उच्च शिक्षण घेऊ शकलाे. माझे एम.एससी. बी.एड. झाले व नाेकरी मिळाली. लहान बहीण एम.एससी. मायक्राेबायाेलाॅजी करून मेडिकलमध्ये तंत्रज्ञ झाली व या काेराेना काळात समर्पितपणे सेवा देत आहे. तिसऱ्या क्रमांकाची एम.ए. बी.एड करून शिक्षिका झाली, तर सर्वात लहान बहिणीने एम.एससी. मायक्राेबायाेलाॅजी करून केंद्रीय विद्यालयात शिक्षिकेची नाेकरी मिळविली. मुलीचा तिरस्कार करण्याच्या काळात आईने सर्व मुलींना शिकविले आणि सन्मानाचे जीवन दिले. आज आम्ही सुखात आहाेत, ते तिने केलेल्या संघर्षामुळे. आईचे उपकार आयुष्यभर संपणार नाहीत.