आई झाल्या देवदूत : २२ मुलांना दिले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:58 PM2019-05-11T23:58:56+5:302019-05-12T00:04:06+5:30

भूतलावर येण्यापूर्वी गर्भातील कोवळा जीव स्वत:च्या जीवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती म्हणजे, गेल्या दोन वर्षाच्या काळात २२ आईंनी जीवाचा धोका पत्करून आपल्या मुलांना केलेले अवयवाचे दान. त्यांना मृत्यूचा दाढेतून परत आणून एकाच आयुष्यात दुसऱ्यांदा जीवन दिले.

Mothers become angels: Gave Lives to 22 Children | आई झाल्या देवदूत : २२ मुलांना दिले जीवनदान

आई झाल्या देवदूत : २२ मुलांना दिले जीवनदान

googlenewsNext
ठळक मुद्देमूत्रपिंड दान करून आयुष्यात दुसऱ्यांदा दिले जीवन

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूतलावर येण्यापूर्वी गर्भातील कोवळा जीव स्वत:च्या जीवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती म्हणजे, गेल्या दोन वर्षाच्या काळात २२ आईंनी जीवाचा धोका पत्करून आपल्या मुलांना केलेले अवयवाचे दान. त्यांना मृत्यूचा दाढेतून परत आणून एकाच आयुष्यात दुसऱ्यांदा जीवन दिले.
मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र’ आशेचे केंद्र ठरले आहे. या केंद्रात प्रथम प्रत्यारोपणासाठी आईनेच पुढाकार घेतला होता. मुलीला मूत्रपिंड दान करून जीवनदान दिले. आज या केंद्राला दोन वर्षांचा कालावधी झाला असतानाही ही परंपरा कायम आहे.
अलीकडे विविध कारणांमुळे मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुण वयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. जन्मदात्या आईला जेव्हा मुलाचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे कळते, तेव्हा ती हादरून गेलेली असते. मुलाच्या चिंतेने तिची तहान-भूक हरविलेली असते. काही करा, मुलाला वाचवा, अशी विनंती डॉक्टरांना करताना दिसते. स्वत: खचून गेली असताना मुलाला मात्र हिंमत देते. तुला काही होणार नाही, होऊ देणार नाही, अशी आशा त्याच्यात जागवते. मुलासाठी ती त्या आजाराच्या विरोधात उभी राहते. डॉक्टर काही बोलण्यापूर्वी माझे मूत्रपिंड घ्या, अशी म्हणणारी ती पहिली व्यक्ती असते. मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेला सामोरे जाताना जीवाचा धोका, झालेले वय, भविष्यात येणाऱ्या अडचणी, वेदना सर्वकाही तिच्यासमोर गौण असतात. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा हिंमतवान आईंची यादीच आहे. २०१६ ते आतापर्यंत २२ आईंनी आपल्या मुलांना मूत्रपिंड दान केले आहे. मुलांसाठी त्या देवदूत ठरल्या आहेत.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्रात शहजाद बी अम्मीने २४ वर्षीय मुलीला, प्रमिला ढबाले या आईने २३ वर्षीय मुलाला, सुनंदा मते या आईने २० वर्षीय मुलाला, शांता खुरसंगे या आईने ४६ वर्षीय मुलाला, वनमाला उके या आईने ३१ वर्षीय मुलाला, विशाखा गजभिये या आईने २४ वर्षीय मुलाला, चंद्रकला मन्ने या आईने ३० वर्षीय मुलाला, इंदू कोडपे या आईने ३५ वर्षीय मुलाला, सुशीला तानोडकर या आईने ३० वर्षीय मुलाला, चंद्रकला सुलताने या आईने ३२ वर्षीय मुलाला, कानेलारू फुके या आईने ४३ वर्षीय मुलाला, पेटकर या आईने २० वर्षीय मुलाला, मीना निकम या आईने १५ वर्षीय मुलाला, मंगला गायकवाड या आईने ३० वर्षीय मुलाला, फातुना अन्सारी या आईने २३ वर्षीय मुलाला, अर्चना पात्रीकर या आईने २१ वर्षीय मुलाला, जानकीबाई शाहू या आईने २१ वर्षीय मुलाला, विमल सिसाम या आईने ३२ वर्षीय मुलाला, अनिता नेताम या आईने २३ वर्षीय मुलीला, जनाबाई लोखंडे या आईने ३२ वर्षीय मुलाला, रेखा डोंगरे या आईने ४० वर्षीय मुलीला तर नीता ठाकूर या आईने १७ वर्षीय मुलाला दुसऱ्यांदा जीवन दिले आहे.

 

Web Title: Mothers become angels: Gave Lives to 22 Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.