मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले
By सुमेध वाघमार | Published: May 14, 2023 09:58 AM2023-05-14T09:58:38+5:302023-05-14T09:58:50+5:30
पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे.
नागपूर : मी डान्सबारमधून परत घरी जात होते. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो ऐकून थांबले. पाहिलं तर कचऱ्याच्या कुंडीजवळून आवाज येत होता. अवघ्या काही तासांचं बाळ तिथं होतं. त्याला घेऊन आम्ही पोलिस ठाण्यात गेलो. आणि तक्रार नोंदविली. त्या बाळाला नियमानुसार अनाथाश्रमात पाठविण्यात येणार होतं, पण काही तासांच्या सहवासाने माझ्यातली आई त्या चिमुकल्याने जागी केली होती. पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे.
हे कथन आहे, आंचल वर्मा या ट्रान्स आईचे. आईचे हृदय असण्यासाठी केवळ स्त्रीच असले पाहिजे, असे नाही, याची साक्ष देणारे हे वास्तव नागपुरातलेच आहे. तिचे नाव आंचलने महालक्ष्मी ठेवले आहे. मुंबईतील महालक्ष्मी भागात ती आपल्याला मिळाली, तो मातेचा आशीर्वाद होता, अशी त्यांची श्रद्धा आहे.
जिथे आपल्याच आयुष्याचा ठावठिकाणा पुरेसा हाती आलेला नसताना, एका मुलीची जबाबदारी घेताना काय विचार होता, काय भावना होत्या, असं विचारलं असता, आंचल म्हणतात, जेव्हा मी तिला कुशीत घेतलं व तिचा तो मासूम चेहरा पाहिला, तेव्हाच माझ्या मनात काही तरंग उठले. तिला जीव लावावा असं वाटलं. तिला दुसऱ्या कुणाच्या हाती सोपविण्याचा विचारही सहन झाला नाही, म्हणून मीच तिला दत्तक घेतलं.
मी लहानपणापासूनच तिला खूप प्रेम दिले. तिला कधीही रागावले नाही. कायमच समजावून सांगत राहिले. चांगले कोण, वाईट कोण, ‘गुड टच-बॅड टच’ शिकविले. महालक्ष्मीनेही मला तितकाच जीव लावला. - आंचल वर्मा