नागपुरात ऑटोचालक सापडले संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:39 PM2020-05-20T22:39:41+5:302020-05-20T22:45:21+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.
शहर उघडले आहेत. आरटीओ कार्यालय सुरू झाले आहे पण ऑटोचालकांना परवानगी मिळाली नाही. आधीच बेरोजगार असलेल्या आॅटोचालकांना इतर उद्योगांप्रमाणे पॅकेजची गरज आहे, अशी भावना विदर्भ ऑटो चालक-मालक संघटनेचे विलास भालेकर यांनी व्यक्त केली. कुटुंबाचे पालनपोषण करता यावे म्हणून ऑटोचालकाना ५००० रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की ८० टक्के ऑटोचालकांवर वाहन कर्ज आहे. कर्जधारकांना ऑगस्टपासून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी दिलासा दिला आहे पण व्याज जिवंत आहे. दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांना कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असताना व्याजाचे पैसे कसे भरणार, हा प्रश्न आहे. प्रत्येकाला ३५०० ते ५००० रुपये कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. व्यवसाय बंद आहे, शिवाय शाळा, कॉलेज बंद असल्याने होणारी थोडीबहुत आवकही बंद आहे. त्यामुळे हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न भालेकर यांनी उपस्थित केला. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून ऑटोचालकाना दिलासा द्यावा, पॅकेज द्यावे आणि त्यांना आपला व्यावसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे भालेकर यांनी केली.