नागपूर विभागासाठी ६ हजार कोटीचे सामंजस्य करार
By आनंद डेकाटे | Updated: March 20, 2025 19:03 IST2025-03-20T18:56:08+5:302025-03-20T19:03:12+5:30
विभागीय गुंतवणूकदार परिषद : १५२ उद्योगांमध्ये ६ हजार ७५६ रोजगार निर्मिती होणार

MoU of Rs 6,000 crore for Nagpur division
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे नागपूर विभागीय स्तरावर गुंतवणूक परिषद २०२५ गुरूवारी नियोजन भवनाच्या सभागृहात पार पडली. या परिषदेत १५२ उद्योजकांचे ६ हजार १०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विदर्भात विविध क्षेत्रात झालेल्या सांमजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये रुपांतर व्हावे यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व विभागीयस्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योजकांनी मोठया प्रमाणात विभागात गुंतवणूक करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी यावेळी केले.
यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष जुल्पेश शहा, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष पी.मोहन, बुटीबोरी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर मालविया, मैत्रीचे समन्वय अधिकारी भास्कर मोराडे, सिडबीचे सहायक महाव्यवस्थापक संतोषराव मोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार, लोपॅक इंडिया लिमिटेडचे शशांक मिश्रा व इंनव्हेन्ट्री रिसर्च कंपनीचे डॉ. दीपक बिरेवार यांच्यासह उद्योजक, गुंतवणुकदार मोठया संख्येने उपस्थित होते.
भारतातील पहिला अत्याधुनिक कागद उद्योग सुरु करणारे झेलोपॅक इंडिया लिमिटेडचे शशांक मिश्रा व इंनव्हेन्ट्री रिसर्च कंपनीचे डॉ. दीपक बिरेवार यांनी येथे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले. संचलन व आभार उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्देमवार यांनी मानले.
उद्योजकांसाठी रेड कारपेटसह आवश्यक सुविधा - विजयलक्ष्मी बिदरी
जिल्हास्तरावर गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना रेड कारपेटसह आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देत आहोत. गडचिरोली जिल्हा स्टिलहब म्हणून विकसित होत असून मोठया प्रमाणात येथे गुंतवणुक येत आहे. १०० दिवसाच्या विशेष कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उद्योजक व गुंतवणुकदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर तर विभागीय आयुक्त विभागीयस्तरावर आढावा घेऊन उद्योजकांच्या अडचणी सोडवतील, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.
दावोसमध्ये विदर्भासाठी ७ लक्ष कोटीचे करार
उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी प्रास्ताविकात दावोस येथील परिषदेमध्ये विदर्भासाठी ७ लक्ष कोटीचे करार झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी १ लक्ष ६ हजार कोटीचे सामंजस्य करार झाले आहे.
असे झाले करार
- गोदिंया येथे एक्सलोपॅक इंडिया लिमिटेड या हायटेक पेपर इंडस्ट्रिज व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनीतर्फे ९५० कोटी, तसेच पेपर उद्योगात २२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकी संदर्भात शशांक मिश्रा यांनी करार केला.
- बुटीबोरी येथे इंनव्हेन्टीस रिसर्च कंपनीतर्फे औषध व रासायनिक निर्मिती क्षेत्रात ७०० कोटी रुपयाची गुंतवणूक
- हॉटेल ताज गेटवे (पीडी प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात ४०० कोटी
- हयात हॉटेल (रचना प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात ३०० कोटी रुपये
- फेयर व्हॅल्यु हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात १३१ कोटी ३० लक्ष रुपये
- हॉटेल हिलटॉनतर्फे पर्यटन क्षेत्रात १७५ कोटी रुपये
- विठोबातर्फे १०० कोटी रुपये