फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:30+5:302021-03-05T04:07:30+5:30

गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग ...

Mouda, Ramtek back in orchard planting scheme | फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

फळबाग लागवड योजनेत मौदा, रामटेक माघारले

Next

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड व वृक्ष लागवड योजनेच्या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये मौदा आणि रामटेक हे दोन तालुके माघारले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही फळबाग लागवड न झाल्याने कृषी विभागासाठी ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून जॉबकार्डधारक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. ग्रामसभांची मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थी निश्चित होतात. या वर्षात राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये १,१९९ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ८७९ शेतकऱ्यांचा सहभाग घेतला. रामटेक तालुक्यासाठी १८० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते, तर मौदा तालुक्यासाठी १९० हेक्टर लक्षांक होते. मात्र दोन्ही तालुक्यात एक हेक्टर क्षेत्रावरही फळबाग उभी राहू शकली नाही. पारशिवणी तालुक्यासाठी १९० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक होते. मात्र फक्त १३.२० हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांची उदासिनता लक्षणीय ठरली आहे.

...

२,६४० हेक्टर लक्ष्यापैकी फक्त ७२४ हेक्टरवरच साध्यता

या योजनेसाठी प्रत्यक्षात २,६४० हेक्टर क्षेत्राचे लक्षांक ठरविण्यात आले होते. मात्र ७२४.७१ हेक्टर क्षेत्रावरच फळबाग लागवड होऊ शकली. रामटेक उपविभागाची कामगिरी सर्वात कमी राहिली. उमरेड विभागातही ५६० पैकी ८६.१ हेक्टर क्षेत्रावरच फळबागा उभ्या राहिल्या. नागपूर विभागातही ८५० पैकी १९१.६८ क्षेत्रावरच हे उद्दिष्ट साध्य झाले. काटोल विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. ६७० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते, ४३३.७३ हेक्टर साध्य झाले.

...

संत्रा, मोसंबीला अधिक पसंती

आंबा, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, चिकू, साग, शेवगा या फळबागांसाठी जिल्ह्यात योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांनी संत्रा आणि मोसंबीसाठी अधिक पसंती दिली. जिल्ह्यात संत्रासाठी ४५६..०६ हेक्टर तर मोसंबीसाठी १४७ हेक्टरवर फळबाग लागवड झाली. यात काटोल, नरखेड आणि कळमेश्वर हे तालुके आघाडीवर आहेत. पेरू ३ हेक्टरवर आणि शेवगा फक्त १ हेक्टरवर लागवड झाली. यासोबतच आंबा १८.१ हेक्टर, सीताफळ ४७.६५, कागदी लिंबू २३.८०, चिकू ४० आणि साग ७० हेक्टरवर लावण्यात आला.

...

कोट

आजवरच्या काळात यंदाची साध्यता सर्वाधिक आहे. कृषी सहायकांना प्रत्येक उपविभागनिहाय उद्दिष्ट दिले जाते. मौदा आणि रामटेक हे भात उत्पादक तालुके असल्याने उद्दिष्ट घटले आहे. बदलत्या ऋतुमानाचाही परिणाम झाला. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

Web Title: Mouda, Ramtek back in orchard planting scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.