अहमद पटेलांच्या निधनामुळे शोककळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:04 AM2020-11-27T04:04:41+5:302020-11-27T04:04:41+5:30
नागपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे शहर काँग्रेसमध्ये शोककळा पसरली. त्यांनी पक्षासाठी मौलिक योगदान दिले होते ...
नागपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे शहर काँग्रेसमध्ये शोककळा पसरली. त्यांनी पक्षासाठी मौलिक योगदान दिले होते व ते अनेकदा पक्षाचे तारणहार ठरले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, असा शहरातील काँग्रेस नेत्यांचा सूर होता.
सेवा, त्याग, समर्पणाचे प्रतीक : राऊत
अहमद पटेल हे आधुनिक चाणक्य होते. सेवा, त्याग, समर्पणाचे ते प्रतीकच होते. त्यांचे संघटनकौशल्य प्रभावी होते. मंत्री झाल्यानंतर त्यांनी सल्ला दिला होता की कुणीही असले तरी काम हे नियमांच्या अंतर्गतच झाले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक जण घडले, असे मत पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
विद्वान राजकारणी, बुद्धिमान नेतृत्व : वडेट्टीवार
अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक निष्ठावंत नेता हरविला आहे. ते एक विद्वान राजकारणी व बुद्धिमान नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे योगदान काँग्रेस कधीच विसरणार नाही. त्यांनी सातत्याने नि:स्वार्थपणे देशसेवा केली. पक्षाला जेव्हाही मदतीची अपेक्षा होती, ते तयार राहायचे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
काँग्रेसचा आधार हरविला : मुत्तेमवार
अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायक आहे.खासदार म्हणून त्यांच्या अनेक आठवणी आहेत. ते एक प्रकारे काँग्रेसचा आधारच होते. काँग्रेससोबतच सोनिया गांधी यांचे व्यक्तिगत नुकसान झाले आहे, असे मत माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केले.
२६-११ हल्ल्याचा सामना करण्यात मोठी भूमिका : अहमद
मुंबईवर झालेल्या २६-११ च्या हल्ल्याचा सामना करण्यात अहमद पटेल यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मार्गदर्शक हरविला आहे, या शब्दांत माजी मंत्री अनिस अहमद यांनी आपली भावना व्यक्त केली.
उत्तम संघटक हरविला : ठाकरे
अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक उत्तम संघटक हरविला आहे. ते देशाच्या राजकारणातील प्रभावी नेते होते. मुख्यमंत्रिपदाची कोंडी असो किंवा सामान्य कार्यकर्त्यांची समस्या, ते ताबडतोब समाधान शोधायचे. प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेसचा तारणहारच गेला : कोटेचा
साधे जीवन, उच्च विचार ठेवणारे अहमद पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून अनेक कठीण कामे पूर्णत्वास नेली. त्यांचा काँग्रेसला कधीही विसर पडणार नाही, अशी भावना प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा यांनी व्यक्त केली.