माऊझर, देशी कट्टे जप्त

By admin | Published: September 17, 2016 03:09 AM2016-09-17T03:09:39+5:302016-09-17T03:09:39+5:30

माऊझर, दोन देशी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस घेऊन मोटरसायकलने सुसाट निघालेल्या दोन शस्त्र तस्करांचा

Mouser, native crude seized | माऊझर, देशी कट्टे जप्त

माऊझर, देशी कट्टे जप्त

Next

दोन तस्कर गजाआड : डीसीपी श्रीधर यांच्या पथकाची हसनबागमध्ये कारवाई
नागपूर : माऊझर, दोन देशी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस घेऊन मोटरसायकलने सुसाट निघालेल्या दोन शस्त्र तस्करांचा पाठलाग करून गुरुवारी रात्री पोलिसांनी त्यांना पकडले. जावेद अली निसार अली (वय २५) आणि शेख अमिन शेख हमिद (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही हसनबागमध्ये राहतात. या आरोपींकडून त्यांचे साथीदार तसेच अन्य गुन्ह्यांची माहिती मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे शुक्रवार पहाटेपासून पोलीस या दोघांची कसून चौकशी करीत आहेत.
गणेश विसर्जनाचा शहरात गुरुवारी सकाळपासून कडक बंदोबस्त होता. चौकाचौकात मोठ्या संख्येत पोलीस तैनात आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास दुचाकीवर बसून दोन तरुण हसनबागकडून सुसाट वेगाने येत असल्याचे पाहून पोलिसांचा संशय बळावला. परिमंडळ चारचे उपायुक्त जी. श्रीधर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून म्हाळगीनगर चौकात त्यांना पकडले. त्यांनी आपले नाव जावेद आणि अमिन अशी सांगितली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्यावळ एक देशी कट्टा अन् काडतूस पोलिसांना आढळले. त्यानंतरच्या चौकशीत पोलिसांनी आरोपीकडून एक मारुती ८०० कार जप्त केली. कारमध्ये पुन्हा माऊझर आणि देशी कट्टे आढळले. अशा प्रकारे एक माऊझर, दोन देशी कट्टे आणि पाच काडतूस जप्त केल्यानंतर पोलिसांनी उपायुक्त जी. श्रीधर यांना माहिती दिली. त्यांनी या दोघांची रात्रभर चौकशी केली.
जावेद कूलरच्या चौकटी (फ्रेम) बनवितो तर अमिन खासगी वाहन चालवतो. जप्त केलेली कार जावेदच्या मालकीची असून, त्याने ती वर्षभरापूर्वी विकत घेतल्याचे तो सांगतो. कट्टे, माऊझर आणि काडतूस उत्तर प्रदेशातील एका शस्त्र तस्कराकडून घेतल्याचे तो सांगतो. मात्र, त्याच्याबाबत माहिती देण्यास आरोपी टाळाटाळ करीत आहे. मैत्रिणीला भेटायला गेलो असताना काही दिवसांपूर्वी एका शाळेजवळ तस्कराची ओळख झाली. त्यानंतर त्याने शस्त्र तस्करीत तगडी रक्कम मिळत असल्याचे सांगितल्याने आपण या धंद्यात गुरफटलो गेलो, असे तो सांगतो.
तर, आपण मैत्रीखातर जावेदसोबत राहतो, या धंद्याशी आपले देणे-घेणे नसल्याचे अमिनने पोलिसांना सांगितले.(प्रतिनिधी)

‘सुरेंद्र’ तस्कर की गेमबाज?
एक साथ तीन अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूस बाळगणारा जावेद शस्त्र तस्करीत गुंतला आहे की कुणाच्या ‘गेम’बाजीत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याने शस्त्र पुरविणाऱ्या तस्कराचे नाव सुरेंद्र असल्याचे सांगितले. पूर्ण नाव किंवा पत्ता माहीत नसल्याचे जावेद म्हणतो. शस्त्र घेण्यासाठी आपण त्याला केवळ फोन करीत होतो आणि तो आपल्याला पाहिजे तेव्हा कट्टा, माऊझर आणि काडतूस आणून देत होता. याव्यतिरिक्त त्याची अथवा त्याच्या टोळीची आपल्याला कसलीही माहिती नसल्याचे तो सांगतो. त्यामुळे ‘सुरेंद्र’च्या मोबाईलवरून त्याचा पत्ता शोधण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत. यासोबतच त्याने यापूर्वी कुणाकुणाला शस्त्र विकले, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
गोळीबार कनेक्शन?
हुडकेश्वर ठाण्यात जावेद आणि अमिनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी कोर्टातून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी याच भागात यासिन कुरेशी नामक तरुणावर पल्सरवरील दोघांनी गोळीबार केला. ते आरोपी लाल रंगाच्या पल्सरवर होते. जावेदजवळून पोलिसांनी सीडी डॉन मोटरसायकल आणि कार जप्त केली आहे. यासिनच्या पूर्वी तहसीलमध्ये एकनाथ निमगडे यांच्यावर माऊझरमधून गोळ्या झाडून अ‍ॅक्टिव्हास्वार आरोपीने त्यांची हत्या केली. या गुन्ह्याचा जावेद, अमिन किंवा सुरेंद्रशी संबंध आहे काय, त्याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे उपायुक्त जी. श्रीधर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Mouser, native crude seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.