मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपिकाच्या एसीबीने बांधल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:04 PM2021-05-10T21:04:50+5:302021-05-10T21:07:18+5:30
ACB trap on headmaster, senior clerk सेवानिवृत्त शिक्षकाच्या पेन्शन केससाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या कोराडी वीज वसाहतील प्रागतिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सगणे व वरिष्ठ लिपिक प्रशांत वामनराव कुरळकर यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : सेवानिवृत्त शिक्षकाच्या पेन्शन केससाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या कोराडी वीज वसाहतील प्रागतिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सगणे व वरिष्ठ लिपिक प्रशांत वामनराव कुरळकर यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कोराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रागतिक विद्यालयातील इंगोले हे सहायक शिक्षक पदावरून नऊ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. नियमानुसार संबंधित शिक्षकांच्या निवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वी त्यांची पेन्शन केस संबंधित विभागाकडे सादर होणे आवश्यक आहे. परंतु इंगोले यांच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक व वरिष्ठ लिपिक या कामात दिरंगाई करत होते. वरिष्ठ लिपिक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना विशिष्ट कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले. मुख्याध्यापकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचीही सुचविले. पेन्शन केससाठी सर्व कागदपत्रे गोळा केल्यानंतर इंगोले यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती मुख्याध्यापक सगळे व वरिष्ठ लिपिक प्रशांत कुरुळकर यांना केली असता त्यांनी २० हजार ५०० हजार रुपये शाळेच्या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी द्यावी, अशी मागणी केली. इंगोले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित बाबीची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी अत्यंत गोपनीयरीत्या याबाबतीत सापळा असून, सोमवारी दुपारी प्रागतिक विद्यालयात मुख्याध्यापक अनिल सगणे व वरिष्ठ लिपिक प्रशांत कुरळकर यांना सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडले. यासंदर्भात कोराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, दिनेश शिवले, गजानन घाडगे, मंगेश कळंबे, सुरज बुधे आदींनी केली आहे.