ऐकत नसलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:12 AM2018-06-06T00:12:21+5:302018-06-06T00:13:09+5:30
इंटरनेट मार्केटिंग हा देशहित, छोटे व्यापारी आणि ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात आवाज बुलंद केला आहे. जे सरकार ऐकते त्यांच्याशी बातचीत आणि जे ऐकत नाही, त्यांच्याविरोधात चर्चासत्र, आंदोलन आणि कोर्टात लढाई, यावर आमचा भर आहे. सरकारने नेहमीच देशहिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय संघटक कश्मीरीलाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंटरनेट मार्केटिंग हा देशहित, छोटे व्यापारी आणि ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात आवाज बुलंद केला आहे. जे सरकार ऐकते त्यांच्याशी बातचीत आणि जे ऐकत नाही, त्यांच्याविरोधात चर्चासत्र, आंदोलन आणि कोर्टात लढाई, यावर आमचा भर आहे. सरकारने नेहमीच देशहिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय संघटक कश्मीरीलाल यांनी केले.
‘कॅट’च्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील सदोदय कॉम्प्लेक्समधील सभागृहात मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मंचावर ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय विचार विभाग प्रमुख अजय पत्की होते.
कश्मीरीलाल म्हणाले, भारतात मोठे रिटेल स्टोर सुरू करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट कंपनीमध्ये भारतात २० दिवसांपूर्वी झालेला १ लाख कोटी रुपयांचा करार अवैध आहे. या विरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. देशहितासाठी करार रद्द करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. तक्रारीनंतर केंद्राच्या कॉमर्स मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. प्रारंभी कमी दरात, नंतर जास्त दरात वस्तू विक्रीचा या कंपन्यांचा फंडा आहे. करारामुळे देशातील सात कोटी लहान व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. मागील मार्गाने भारतात शिरकाव करण्याचा वॉलमार्टचा प्रयत्न हाणून पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले.
एअर इंडिया कंपनीच्या विक्रीवर ते म्हणाले, सरकार तोट्यातील एअर इंडियाला विदेशी कंपनीला विकण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारचा डाव आम्ही सफल होऊ देणार नाही. सरकारने कंपनीचे समभाग देशातील कंपन्यांनाच विकावे. त्यामुळे कंपनीची मालकी देशातच राहील. देशातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी मंच कार्यरत आहे. मंच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावरही जागरूक आहे. अमेरिकेची मॉन्टेन्सो कंपनी जेनेटिकली मॉडिफाईल सरसो बियाणे भारतात विक्रीचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी याच कंपनीचा वांग्याचे बियाणे भारतात आणण्याचा प्रयत्न मंचचा विरोध, जनजागृती आणि आंदोलनामुळे फसला होता. हा नागरिकांच्या आरोग्याची मामला आहे. मॉन्टेन्सोचा प्रयत्न पूर्ण होऊ देणार नाही. मंचचे सेंद्रीय शेतीचे अभियान आहे.
पत्रपरिषदेत मंचच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य धनंजय भिडे, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, उपाध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅट नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, पदाधिकारी, निखिलेश ठाकर, रमेश उमाटे, मंचच्या डॉ. अमिता पत्की, माधुरी जोशी, जयश्री गुप्ता, स्वप्ना तलरेजा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.