हवालदारावर हल्ला करणारा गजाआड
By admin | Published: September 18, 2016 02:34 AM2016-09-18T02:34:04+5:302016-09-18T02:34:04+5:30
वाहतूक शाखेच्या हवालदाराला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सूर्यकांत अरुण व्यास (वय २५) याला
लालगंजमध्ये सापडला आरोपी : रविवारी कोर्टात नेणार
नागपूर : वाहतूक शाखेच्या हवालदाराला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सूर्यकांत अरुण व्यास (वय २५) याला गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी लालगंज परिसरात पकडले. त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.
दीक्षाभूमी चौकाजवळ, माता कचेरी परिसरात असलेल्या शासकीय वसाहतीत आरोपी राहतो. त्याच्या वडिलांना सेवेत असताना हे शासकीय निवासस्थान उपलब्ध झाले होते. तो खासगी वाहनचालक म्हणून काम करतो. त्याला दारूचे भारी व्यसन आहे.
मोठ्या प्रमाणात दारू पिल्यानंतर शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता तो ट्रीपल सीट दुचाकी चालविताना संत्रा मार्केट परिसरात पकडला गेला होता. वाहतूक शाखेचे (उत्तर विभाग) हवलदार प्रकाश रामकृष्ण बारंगे (वय ४६, रा. विश्वकर्मानगर, अजनी) आणि हवालदार मोहन रेवतकर या दोघांनी त्याला पकडले. त्याची वैद्यकीय तपासणी (ब्रीथ अॅनलायझर टेस्ट) करण्यासाठी त्याला हवलदार बारंगे यांनी दुचाकीवर बसवले. ते वाहतूक शाखेच्या उत्तर विभाग कार्यालयात जात होते. रस्त्यात आरोपी व्यासने बारंगेचा गळा आवळून त्यांना खाली पाडले आणि हेल्मेट तुटेपर्यंत मारले. त्यानंतर व्यासने बाजूचा दगड उचलून बारंगे यांचे डोके ठेचले. बारंगेंना गंभीर जखमी करून आरोपी पळून गेला. गणेशपेठचे ठाणेदार महेश चव्हाण यांनी याप्रकरणी आरोपी व्यासविरुद्ध प्राणघातक हल्ला अन् शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
सासऱ्याच्या दारासमोरच जेरबंद
या घटनेमुळे पोलिसांची विविध पथके रात्रीपासूनच आरोपीचा शोध घेत होती. त्याच्या सर्वच नातेवाईकांच्या घराजवळ पोलीस बसून होते. रात्रभर लपत छपत फिरणारा आरोपी व्यास लालगंजमधील त्याच्या सासऱ्याच्या घरी शनिवारी दुपारी १ च्या सुमारास येतना दिसला. पोलिसांनी सासऱ्याच्या दारासमोरच व्यासवर झडप घातली. त्यानंतर त्याला गणेशपेठ ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी व्यासविरुद्ध २०१२ मध्ये ड्रंक न ड्राईव्हची कारवाई केली होती. त्यावेळी त्याच्याकडे शस्त्र सापडल्याने हत्यार कायद्यानुसारही गुन्हा दाखल केला होता, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
बारंगेची प्रकृती धोक्याबाहेर
जखनी बारंगेवर रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बारंगे यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.