‘अभिजात’ दर्जासाठी महाराष्ट्रदिनी आंदोलन

By admin | Published: April 27, 2017 02:15 AM2017-04-27T02:15:55+5:302017-04-27T02:15:55+5:30

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. सामान्य मराठी जणांपासून विविध साहित्य संस्थांनी

The movement for 'Classics' | ‘अभिजात’ दर्जासाठी महाराष्ट्रदिनी आंदोलन

‘अभिजात’ दर्जासाठी महाराष्ट्रदिनी आंदोलन

Next

‘मसाप’चा निर्णय : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे
नागपूर : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. सामान्य मराठी जणांपासून विविध साहित्य संस्थांनी सातत्याने ही मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल ९० हजार पत्रे पाठवली. पण, केंद्र सरकार जागचे हलायला तयार नाही. राज्य सरकारही या विषयावर केवळ औपचारिकता दाखवत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारांना मराठीच्या अभिजाततेचे स्मरण करून देण्यासाठी १मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे देण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही तमाम महाराष्ट्रासाठी एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. मराठी भाषा हे निकष निश्चितपणे पूर्ण करते. तसा अहवाल प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेतील समितीने सप्रमाण केंद्र सरकारला देऊनही केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांसह राज्यभरातील साहित्य संस्थांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी धरणे द्यावे, असे आवाहन ‘मसाप’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

नागपुरात मात्र सामसूम
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यभरात असे आंदोलनाचे वारे वाहत असताना साहित्य महामंडळाचा मुक्काम असलेल्या नागपुरात मात्र सारेच सामसूम आहे. मुख्यमंत्र्यांचे मूळ निवासस्थान नागपुरात आहे. परंतु महाराष्ट्र दिन तीन दिवसांवर असताना शहरातील साहित्य संस्थांमध्ये अशा कुठल्या धरणे आंदोलनाबाबत चर्चाही झालेली नाही. ‘मसाप’चे आवाहन नागपुरात पोहोचले नाही की येथील साहित्य संस्थांना अशा कुठल्या आंदोलनात रस नाही, असा प्रश्न या निमित्ताने समोर झाला आहे.

Web Title: The movement for 'Classics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.