स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीने चळवळच संपली
By Admin | Published: December 16, 2014 01:05 AM2014-12-16T01:05:52+5:302014-12-16T01:05:52+5:30
बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या
दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची खंत : एस.सी.एस. व्याख्यानमाला
नागपूर : बाबासाहेबांच्या विचारावर जगण्याची आमची निष्ठा कमी होते की काय असे वाटते आहे. जे लोक डॉ. आंबेडकरांचा विचार सोडतात ते विचारशून्य आणि ध्येयशून्य होतात. असे ध्येयशून्य लोक स्वत:च्या स्वार्थासाठी विचारधारेचा बळी देतात आणि पदे मिळवून भौतिक सुखात रममाण होतात. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक लोक अशाच नेतृत्वाच्या मागे लागतात तेव्हा विचार संपतो आणि चळवळही संपते. आंबेडकरवादी चळवळीचे हेच झाले, त्यामुळे आपली चळवळच संपली असल्याची खंत दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आजची आपली चळवळ’ विषयावर व्याख्यान देताना राजा ढाले बोलत होते. हा कार्यक्रम एस. सी. एस. गर्ल्स हायस्कूल, पाचपावली येथे सोमवारी सायंकाळी पार पडला. आज कुठलीही आंबेडकरवादी चळवळ सुरू नाही, कारण नेतृत्व करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांभाळला नाही. बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत इतरांशी संधान साधायचे, यामुळे चळवळीच्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. चळवळीतल्या निष्ठावंतांच्या उणिवांमुळेच हे घडले आणि घडते आहे पण सारेच काही संपलेले नाही. आंबेडकरांचा विचार आणि आपल्यातील बंधूता, ध्येयवाद, निष्ठा पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आपल्यात आहे. त्यासाठी मी पुन्हा तयार आहे, पण मला निष्ठावंत युवक हवे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊ लोखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, विजय चिकाटे उपस्थित होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनीही आपली बाबासाहेबांच्या विचारावरची श्रद्धा कमी झाली तर भौतिक सुखे कदाचित मिळतील; पण वैचारिक स्वातंत्र्य आपण गमावून बसू. माणूस म्हणून जगायचे असेल तर बाबासाहेबांचा विचारच आपल्याला तारू शकतो, अन्यथा वैचारिक गुलामगिरीतच आपल्या पिढ्या राहतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)