पर्यावरण संवर्धनाची चळवळ काळाची गरज : महापौरांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 09:59 PM2019-06-17T21:59:05+5:302019-06-17T21:59:47+5:30
सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या पुढाकाराने वृक्ष आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात व्यापक कार्य व्हावे यासाठी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्यासाठी महापौर कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांना सोमवारी महापौरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्व्हेनर डॉ. प्रशांत कडू उपस्थित होते.
नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष आणि जलसंवर्धनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. वृक्षलागवडीसोबतच वृक्ष जगविण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. शहरातील पाणीसाठा वाढविण्यात जलमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, यासाठी महापालिका आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित वृक्षमित्र आणि जलमित्रांना महापौरांनी ओळखपत्रांचे वाटप केले. महापालिकेच्या माध्यमातून होणाºया विधायक कार्याला शुभेच्छा दिल्या. दिलेल्या संधीचे सोने करू. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करू, अशी ग्वाही वृक्षमित्र आणि जलमित्रांनी दिली.