कामगार चळवळीचा केंद्रबिंदूच हरवतोय!
By admin | Published: May 2, 2017 02:00 AM2017-05-02T02:00:17+5:302017-05-02T02:00:17+5:30
मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे.
बैद्यनाथ चौकातील कामगार भवनाची व्यथा : मिल कामगार चळवळीचा ऐतिहासिक वारसा
मंगेश व्यवहारे नागपूर
मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे. कधी काळी येथे असलेली कामगारांची लगबग आता हरविली आहे. मिल कामगारांच्या मेहनतीतून उभ्या झालेल्या या वास्तूमध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कार्यालय आपल्या भूतकाळातील आठवणी जपून आहे. आज या वास्तूच्या मेंटेनन्सचाही वांदा येत असल्याने यातील काही खोल्या किरायाने दिल्या आहेत. काळाच्या ओघात जशी मिल कामगारांची चळवळ लोप पावली तशीच ही वास्तू लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
कधी काळी देशातील सर्वात मोठा कामगारवर्ग हा मिलमध्ये काम करणारा होता. त्याकाळी मिल कामगारांच्या चळवळी सरकारवर दबाव निर्माण करतील एवढ्या प्रभावी असायच्या. नागपुरात असणाऱ्या तीन मिलमध्ये शहरातील १९५० ते ६० च्या दशकात २५ ते ३० हजार कामगार काम करायचे. त्यावेळी मिल कामगारांच्या चळवळी अतिशय प्रभावी होत्या. माजी मंत्री नरेंद्र तिडके, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, मधुकरराव किंमतकर हे मिल कामगारांच्या चळवळीतून पुढे आलेली नावे आहेत. या मिल कामगारांना संघटित ठेवणारा राष्ट्रीय मिल मजदूर संघ हे प्रभावी संघटन होते. या संघटनेने मिल कामगारांसाठी स्वत:ची वास्तू असावी, या उद्देशातून कामगार भवनाची निर्मिती केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बैद्यनाथ चौकात या वास्तूची निर्मिती झाली. १९६८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, मिल प्रशासनाशी लढा, कामगारांचे प्रशिक्षण, मिल कामगारांच्या संदर्भात शासनाशी पत्रव्यवहार येथून चालायचा. मिल कामगारांच्या हक्काची ही वास्तू होती. त्या काळी सदासर्वदा येथे कामगारांची लगबग असायची. सभासदांच्या वार्षिक वर्गणीवर या वास्तूचे मेंटेनन्स व्हायचे. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुषांचे पुण्यतिथी, कामगार दिवस हे सोहळे भव्यतेने साजरे व्हायचे. कामगार चळवळीतील मोठमोठ्या नेत्यांचे त्याकाळी येथे वास्तव्य असायचे.
१९८६ मध्ये एम्प्रेस मिल बंद पडल्यानंतर सरकारशी, प्रशासनाशी लढा येथूनच उभारला होता. कालांतराने शासनाच्या धोरणामुळे शहरातील एम्प्रेस, मॉडेल मिल व नागपूर सहकारी सूतगिरणी बंद पडली. कामगार बेरोजगार झाले. हळूहळू कामगारांच्या संघर्षाची ऊर्जा कमी होत गेली आणि या कामगार भवनाचीही लगबग झाली.
आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ या इमारतीची देखभाल करीत आहे. संघाचे कार्यालय येथे आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे जिल्हा कार्यालय येथे आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांच्या न्यायालयीन प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. बंद पडलेल्या सूतगिरणीतील कामगारांच्या मागणीवर शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु या भवनाची भव्यता आज राहिलेली नाही. कधीकाळी कामगार दिनानिमित्त येथे अधिवेशने, संमेलने भरायची आज येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन औपचारिकता पार पाडावी लागत आहे. (प्रतिनिधी)
शासनाची कामगारविरोधी धोरणे, कामगार नेत्यांची स्वहिताची वृत्ती यामुळे कामगार चळवळीची ऐतिहासिक वास्तू असलेल्या या भवनाचे ऐश्वर्य हरविले आहे.
तुकाराम डेकाटे,
महासचिव, राष्ट्रीय मिल मजदूर संघ