स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सेवाग्रामला आंदोलन
By admin | Published: January 31, 2017 03:00 AM2017-01-31T03:00:09+5:302017-01-31T03:00:09+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नुकतेच रास्ता रोको
विदर्भ राज्य आंदोलन समिती : ६ एप्रिलला ‘रेल रोको’
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले होते. विदर्भात ८५ ठिकाणी आंदोलन पार पडले. आता सेवाग्राम (वर्धा) येथे ६ एप्रिल रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी समितीच्या गिरीपेठ येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा व कार्यक्रमही निश्चित करण्यात आला. त्यानुसार ६ एप्रिल रोजी सेवाग्रामला रेल रोको आंदोलन केले जाईल. त्यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी तिरोडा (गोंदिया) येते समितीच्या वतीने महिला मेळावा होईल. यात मायक्रो फायनान्स कंपनीने दिलेल्या कर्जमाफीविषयी चर्चा व निर्णय घेतला जाईल. १० मार्चला यवतमाळला शेतकरी मेळावा होईल. १८ मार्चला बुलडाणा येथे शेतकरी मेळावा होईल. २० मार्चला अमरावतीत तर ३० मार्चला हिंगणघाट येथे महिला मेळावा होईल. तसेच एप्रिल महिन्यात चंद्रपूर येथे विजेचे दर निम्मे करा, लोडशेडिंग बंद करा, विदर्भाला प्रदूषित करणाऱ्या नवीन प्रस्तावित १३२ प्रकल्पांची मान्यता रद्द करा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येईल.
यावेळी अॅड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला अॅड. मोरेश्वर टेंभुर्डे, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, अॅड. नंदा पराते, अरुण केदार, धर्मराज रेवतकर, डॉ. ख्वाजा, प्रा. पुरुषेत्तम पाटील, धनंजय धार्मिक, टी.बी. कटरे, अॅड. अर्चना नंदघरे, अॅड. माधुरी रहांगडाले, अनिल तिडके, किशोर पोतनवार, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रा. सोपान चिकटे, प्रा. अनिल ठाकूरवार, हिरचंद बोरकुटे, रफीक रंगरेज, ताराबाई बारस्कर, भय्यालाल माकडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
गावाच्या वेशीवर लावणार विदर्भाचे फलक
या बैठकीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीची गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करणे, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय सुरू करणे, समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या घरावर जय विदर्भचा झेंडा लावणे व संपर्क कार्यालयाची पाटी लावणे तसेच गावाच्या वेशीवर विदर्भाचे फलक लावणे आदी निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी २१ प्रमुख कार्यकर्त्यांची उपसमिती सुद्धा यावेळी गठित करण्यात आली.