वनहक्क दावे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:52+5:302021-06-22T04:07:52+5:30
नागपूर : वनजमीन अतिक्रमितांना वनहक्काचे दावे मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा देत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वात ...
नागपूर : वनजमीन अतिक्रमितांना वनहक्काचे दावे मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा देत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वात संविधान चौकात ‘घेरा डालो, डेरा डालो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
सोमवारी दुपारी १२.३० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. रामटेक, पारशिवनी, सावनेर, कुही, उमरेड, कामठी, नागपूर ग्रामीण, हिंगणा तालुक्यातून सुमारे २००वर महिला-पुरुष आंदोलकांनी दुपारच्या आंदोलनात सहभाग घेतला. वनाधिकार अधिनियमांतर्गत वनहक्क दावेदारांना तसेच झोपडपट्टीधारकांना पट्टे मिळण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सायंकाळनंतरही काही कार्यकर्ते आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसून आहेत. मंगळवारी दुपारनंतर त्यात पुन्हा सहभाग वाढेल, असे जिल्हा सचिव अरुण वनकर यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान वनकरलिखित ‘मोदी सरकारचा सात वर्षाचा अत्यंत वाईट कार्यकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांच्या हस्ते करण्यात आले. भाकपा नेते प्रा. युगल रायलु, नत्थु परतेती, ॲड. आनंद गजभिये, गंगाराम खेडकर, जलीम शेख, ऋषी सहारे, बंडू लांडगे, अमर ढेपे, सुनील पत्रे, क्रिष्णा ठाकरे, शांताबाई पोहनकर, नागो मेश्राम आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.