महाराजबाग फाऊंडेशन निर्मितीच्या दृष्टीने हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:31+5:302021-05-14T04:07:31+5:30
नागपूर : येथील १२५ वर्षे जुन्या महाराजबागेसाठी फाऊंडेशन बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नव्या फाऊंडेशनच्या निर्मितीच्या दृष्टीने पंजाबराव देशमुख ...
नागपूर : येथील १२५ वर्षे जुन्या महाराजबागेसाठी फाऊंडेशन बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. या नव्या फाऊंडेशनच्या निर्मितीच्या दृष्टीने पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने तो मंजूर केला आहे. यामुळे महाराजबाग फाऊंडेशन निर्मितीच्या मार्गातील मुख्य अडथळा आता दूर झाला आहे.
मागील ९ वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोरेवाडा फाऊंडेशनच्या निर्मितीनंतर या हालचालींना पुन्हा वेग आला. मागील चार वर्षांपासून हा मुद्दा सातत्याने रेटला जात होता. काही महिन्यांपूर्वीच नव्याने प्रस्ताव तयार करून तो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन महिनाभरापूर्वीच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने तो मंजूरही केला आहे.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया झाल्यावर फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यानंतर हे फाऊंडेशन अस्तित्त्वात येणार आहे. १८९४मध्ये स्थापन झालेली महाराजबाग १२५ वर्षांची झाली आहे. निव्वळ पर्यटकांच्या बळावर चालणारे हे देशातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे.
...
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे ?
नव्याने अस्तित्त्वात येणाऱ्या महाराजबाग फाऊंडेशनमधील कर्मचाऱ्यांवर कुणाचे नियंत्रण असेल, असा प्रश्न आता विचारला जात आहे. सध्या येथे २७ कर्मचारी आहेत. त्यातील ७ ते ८ कर्मचारी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे असून, अन्य कर्मचारी कंत्राटी आहेत. फाऊंडेशनच्या निर्मितीनंतर या सर्व कर्मचाऱ्यांपुढे नव्या पदस्थापना देताना पिकेव्ही की, फाऊंडेशन असा प्रस्ताव असेल. त्यानुसार आखणी होणार असल्याची माहिती आहे.
...
कोट
महाराजबाग विकास संस्था अर्थात फाऊंडेशन स्थापण्याच्या दृष्टीने प्रकिया सुरू आहे. पुढील काही दिवसात हे फाऊंडेशन अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने प्रस्ताव मंजूर केला असून, यातील तांत्रिक मार्ग मोकळा झाला आहे.
- सुनील बावसकर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणीसंग्रहालय
...