मनपात दोन सदस्यीय प्रभागासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:11+5:302021-07-14T04:10:11+5:30
नागपूर : राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्याचा कायदा विधिमंडळात मंजूर करण्यात आला असला तरी दोन ...
नागपूर : राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्याचा कायदा विधिमंडळात मंजूर करण्यात आला असला तरी दोन सदस्यीय पद्धतीनेच निवडणूक व्हावी, यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचा दोन सदस्यीय पद्धतीला विरोध आहे. त्यामुळे मुंबई- पुणे वगळून उर्वरित राज्यासाठी एक सदस्यीय पद्धत लागू करण्याची अधिसूचना काढण्याचा पर्याय काँग्रेसने समोर केला आहे. विशेष म्हणजे भाजपचेही काँग्रेसच्या या भूमिकेला पाठबळ दिले आहे.
२०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. सुमारे ५० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग होता. प्रभागाचा विस्तार मोठा असल्यामुळे अपक्ष, छोटे पक्ष तसेच संघटन बांधणी नसलेल्या पक्षांना फटका बसला. भाजपला चौफेर याचा फायदा झाला. तेव्हापासूनच पुन्हा एकदा एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत होती. मात्र, भाजपकडून प्रतिसाद मिळत नव्हता. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सत्तेत आली व प्रभाग रचनेत बदल होण्याच्या आशा बळावल्या. महाविकास आघाडी सरकारने नागपुरात झालेल्या २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात सुधारणा विधेयक मंजूर करीत एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली. त्यावेळी सभागृहात भाजपने या निर्णयाला विरोध केला होता. दुसरीकडे एक सदस्यीय प्रभागात क्षेत्र कमी असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांना फायदा झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता नवा काही बदल होऊ नये, यावर अडून आहेत.
------------
अधिसूचना काढण्याचा पर्याय
- २०१७ मध्ये फडणवीस सरकारने अधिसूचना काढून चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. नंतर विधिमंडळात या संबंधीचे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीनेही अधिसूचना काढून दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
--------
पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता विरोध
- २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचे सुधारणा विधेयकावरील चर्चेत महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचे दिसून आले होते. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केला होता. एक सदस्यीय प्रभागात आरक्षणामुळे कार्यकर्त्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे किमान दोन सदस्यीय प्रभाग केला तर बरे होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आता त्यांची हीच भूमिका काँग्रेसच्या इतरही नेत्यांना पटली आहे.
-----------------
अशा झाल्या निवडणुका
वर्ष प्रभाग पद्धती
२००७- एक सदस्यीय प्रभाग
२०१२ - दोन सदस्यीय प्रभाग
२०१७ - चार सदस्यीय प्रभाग
२०२२ - एक सदस्यीय प्रभाग (जाहीर)