शनिवारपासून पुन्हा रंगणार खासदार सांस्कृतिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 01:36 PM2022-03-16T13:36:22+5:302022-03-16T13:39:48+5:30
हा महोत्सव १९ ते २४ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये रंगण्यास सज्ज झाला असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना निर्बंधामुळे डिसेंबरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाला अचानक ब्रेक लागला होता. निर्बंध हटल्याने आणि कोरोनाचा धोका टळल्याने, ब्रेक नंतर आता पुन्हा हा महोत्सव १९ ते २४ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये रंगण्यास सज्ज झाला असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १९ मार्च रोजी ‘माय कंट्री... माय म्युझिक’ या गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने होणार असून, २० मार्चला ‘इंडिपॉप क्वीन’ सुनिधी चौहान, २१ मार्चला ‘वंडर व्हाईस’ साईराम अय्यर, २२ मार्चला ‘व्हर्सटाईल’ जावेद अली यांचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित होणार आहेत.
२३ मार्च रोजी हास्यकवी संमेलनात पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, पद्मश्री सुरेंद्र दुबे, अरुण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्ला, कविता तिवारी व डॉ. विष्णू सक्सेना सहभागी होतील आणि गुरुवारी २४ मार्च रोजी पद्मश्री हेमामालिनी यांच्या ‘राधा रासबिहारी’ या नृत्यनाटिकेने महोत्सवाचा समारोप होणार आहे. महोत्सवासाठी डिजिटल पासेसची सुविधाही करण्यात आल्याचे सोले यांनी सांगितले.