नागपुरात आजपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव; संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:00 AM2021-12-17T07:00:00+5:302021-12-17T07:00:07+5:30
Nagpur News खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०२१ चा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०२१ चा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच ‘चक दे इंडिया’ या थीमवर फिल्मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार आहे. सुखविंदर सिंह हे खासदार सांस्कृतिक महोत्सवात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहेत.
- घरबसल्या मिळवा पासेस
नागपूरकरांना या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरिता नागरिकांनी ९१५८८८०५२२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून, एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्लीक केल्यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करता येईल.
- कोविड नियमांचे होणार काटेकोर पालन
खासदार सांस्कृतिक महोत्सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता, यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यासंदर्भात घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीची त्यासाठी मदत घेतली जात असून, आयोजनस्थळी दररोज ८ ते १० हजार N- ९५ मास्क वितरित केले जाणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून, पटांगणाच्या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्यवस्था राहणार आहे.