खासदार सांस्कृतिक महोत्सव : इथे नृत्य नव्हे तर सारी दैवते ऑन व्हील्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:58 PM2019-12-14T23:58:49+5:302019-12-15T00:11:10+5:30
कलेची साधना अपूर्णावस्थेला पूर्णत्व प्रदान करते. तानसेनाच्या आर्त स्वरांनी पावसाची बरसातही केली अन् ओलाव्यातल्या पवित्र वातावरणात दिव्यांची माळही फुलवली होती. अशाच साधनेची अनुभूती शनिवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कलेची साधना अपूर्णावस्थेला पूर्णत्व प्रदान करते. तानसेनाच्या आर्त स्वरांनी पावसाची बरसातही केली अन् ओलाव्यातल्या पवित्र वातावरणात दिव्यांची माळही फुलवली होती. अशाच साधनेची अनुभूती शनिवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात आली. म्हणायला कार्यक्रमाचे शीर्षक ‘डान्स ऑन व्हील्स’ होते. मात्र, अंगातील अपूर्णावस्थेला साधनेचे पूर्णत्व प्रदान करणाऱ्या दिव्यांग कलावंतांच्या आविष्कारी डान्स फॉर्मेशन्सने जणू ‘गॉडस ऑन व्हील्स’ची प्रचिती रसिकसाधकांना आली.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी प्रसिद्ध भरतनाट्यम् गुरू डॉ. सय्यद पाशा यांच्या ‘मिरॅकल्स ऑन व्हील्स’ संस्थेच्या शिष्यवृंदांनी ‘डान्स ऑन व्हील्स’ हा कार्यक्रम सादर केला. अगदी पहिल्या परफॉर्मन्सपासून चकित झालेल्या नागपूरकर रसिकांनी टाळ्यांची जी बरसात केली ती पुढचे तीन तास सुरूच होती. रसिकांवर अचंबित करणाऱ्या या सादरीकरणाची अशी काही मोहिनी चालली की ते स्वत:ला रोखू शकले नाही. अनेकांनी तर भावविभोर होऊन या दिव्यांग कलावंतांना नमन केले. ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ असो, गणपती वंदना असो की शिवतांडव असो सगळेच सादरीकरण तडाखेबाज होते. ‘ऐगीरी नंदिनी’वर सादर झालेले दुर्गेचे रौद्ररूप तर विस्मयकारीच होते. त्यात क्रिष्णकन्हैयाच्या लीला चक्रावून सोडणाऱ्या होत्या. तत्पूर्वी प्रसिद्ध पियानोवादिका गौरी कप्पल यांनी तबलावादक मोहम्मद यांच्या संगतीने ऐंशीच्या दशकातील सुमधूर गीते सादर करीत रसिकांची मने जिंकली. श्रीमंतांच्या दिवाणखान्यात दिमाखाने सजणाऱ्या पियानोच्या अथांग स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. पल पल दिलके पास, अजीब दास्तां है ये, पुकारता चला हुं मैं, आयेगा आयेगा आनेवाला, मेरा जुता है जपानी, बेकरार करके हमे यू ना जाइये,
उडे जब जब जुल्फे तेरी, ये अपना दिल तो आवारा, ओ मेरी जोहरा जबी ही शब्दविरहित गाणी पियानोवर सरसर चालणाऱ्याअंगुलीनिर्देशांनीच रसिकांच्या ओठांतून शब्दबद्ध होत होती. दीपप्रज्वल संस्कार भारतीच्या कांचन गडकरी, उद्योगपती जयसिंग चव्हाण, डॉ. उदय बोधनकर, गिरीश व्यास, गौरी कप्पल, अॅड. तृप्ती देसाई, डॉ. सय्यद पाशा, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, डॉ. गिरीश गांधी, आ. अनिल सोले यांच्या हस्ते झाले. श्याम देशपांडे यांनी प्रेरणागीत सादर केले. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.
तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण ऐकल्या नाही!
पहिल्याच सादरीकरणाने भावविभोर झालेल्या रसिकांच्या टाळ्यांनी संपूर्ण पटांगण गजबजून उठले. रसिकांना अभिवादन करण्यासाठी डॉ. सय्यद पाशा आले आणि तुमच्या टाळ्या आम्ही ऐकल्या नाही, असे म्हणताच रसिकांनी पुन्हा जोरदार टाळ्यांचा गजर केला. आमच्या या कलावंतांना ऐकता-बोलता येत नाही, ही वास्तविक स्थिती सांगितल्यावर संपूर्ण पटांगण सुन्न झाले. ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकताही येत नाही, त्यांना तुमच्या टाळ्या ऐकू आल्या नाही. मात्र, तुमच्या भावना समजल्या. तुम्ही टाळ्यांऐवजी यांना हात दाखवून प्रोत्साहित करा म्हटल्यावर रसिकांनी उभे राहून हात उंचावले. तेव्हा या कलावंतांना रसिक उत्स्फूर्त दाद देत असल्याचे कळले आणि त्यांनीही हात उंचावून आभार मानले.
जगात फक्त भारतातच मुस्लिम स्वातंत्र्याने जगतात - डॉ. पाशा
सध्या वर्तमान स्थितीवर सुरू असलेल्या हलकल्लोळाचा संदर्भ घेत डॉ. पाशा यांनी वक्तव्य केले. जगाची स्थिती बघता फक्त भारतातच मुस्लिमांना स्वातंत्र्य आहे आणि आम्ही आनंदाने जगत आहोत. म्हणूनच, माझी बायको दुर्गा साकारते आणि मी कृष्ण, अशी भावना डॉ. सय्यद पाशा यांनी यावेळी व्यक्त केली. खासदार सांस्कृतिक महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आम्हाला संधी दिली. त्यामुळे हा महोत्सव दिव्यांगांच्या साधनेने पवित्र झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.