खासदार डॉ. विकास महात्मे यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:00 AM2018-06-10T00:00:15+5:302018-06-10T00:00:37+5:30
दिल्लीतील एका ठगाने खासदार डॉ. विकास हरिभाऊ महात्मे यांना दीड लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात ठगबाजाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. महात्मे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. राकेश सप्रू असे आरोपीचे नाव असून तो नवी दिल्लीतील मालवीय नगरात राहतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीतील एका ठगाने खासदार डॉ. विकास हरिभाऊ महात्मे यांना दीड लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात ठगबाजाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. महात्मे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. राकेश सप्रू असे आरोपीचे नाव असून तो नवी दिल्लीतील मालवीय नगरात राहतो.
डॉ. महात्मे यांचे वर्धा मार्गावरील सेंट्रल एक्साईज कॉलनीत कार्यालय आहे. २४ नोव्हेंबर २०१६ ला सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता डॉ. महात्मे यांचा आरोपी सप्रूसोबत पहिल्यांदा संपर्क झाला. महात्मे यांना वूल शेअरिंग मशीन आणि लॉ कटर घ्यायचे होते. या दोन्ही उपकरणांचे आरोपी सप्रूने डॉ. महात्मे यांना कोटेशन पाठविले. ते मंजूर करून डॉ. महात्मे यांनी सपू्रला १ लाख, ५५ हजार, २७ रुपयांचा धनादेश पाठविला. त्याची रक्कम घेतल्यानंतर १५ दिवसात दोन्ही उपकरण उपलब्ध करून देण्याचा करारनामा आरोपीने केला होता. मात्र, अनेक महिने उलटून गेल्यानंतरही आरोपीकडून कराराची पूर्तता झाली नाही. उपकरणे मिळावी म्हणून डॉ. महात्मे यांच्या कार्यालयातून बरेचदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आरोपीकडून प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आरोपी सप्रूने दिलेल्या कार्यालयातील पत्त्यावर संपर्क करण्यात आला. तेथे आरोपीचे कार्यालयच नव्हते. त्यामुळे त्याच्याशी फोनने संपर्क करण्यात आला. यावेळी आरोपीने डॉ. महात्मे यांना त्यांची रक्कम परत देतो, असे म्हणून अॅक्सिस बँकेचा धनादेश पाठविला. तो बँकेत जमा केला असता आरोपीच्या खात्यात रक्कम नसल्याने तो वटलाच नाही. त्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्याने डॉ. महात्मे यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सप्रूचा शोध घेतला जात आहे.