कंगनाला फार महत्व देऊ नये, तिची तितकी लायकी नाही : खासदार कृपाल तुमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:53 PM2021-11-18T13:53:16+5:302021-11-18T14:11:05+5:30
महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची लायकी नाही, ती तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.
नागपूर : नेहमीच वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनावर 'महात्मा गांधी'बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरावरून टीकेची झोड उडत आहे. असे असले तरी, बाईं सुसाटपणे बोलत सुटते. तिच्या वक्तव्यावर आता रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीही जोरदार टीका केली आहे.
कंगनाने 'महात्मा गांधीं'बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना तुमाने म्हणाले, कंगनाला पद्मश्री कसा मिळाला, कोणाचे पाय चाटून मिळाला हे सर्वांनाच माहित आहे. महात्मा गांधींबाबत बोलण्याची तिची लायकी नाही, त्यांना सत्तेची लालसा असती तर, ते त्यावेळी प्रधानमंत्री-राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कंगना तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही. मीडियानं तिला फारसं महत्व देऊ नये, असंही तुमाने बोलताना म्हणाले.
कंगनाच्या पोस्टमध्ये काय?
कंगनाने भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळाले, असे विधान केले होते. त्यानंतर, तिने पुन्हा एकदा महात्मा गांधींविषयी अनुदार उद्गार काढत, महात्मा गांधींमध्ये अजिबात हिंमत नव्हती, ते अतिशय चलाख व सत्तेची लालसा असणारे होते, असे म्हटले. यासोबतच, तिने भगतसिंग यांना फाशी व्हावी, अशीच त्यांची इच्छा होती. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कधीच पाठिंबा दिल नाही, अशी वक्तव्ये केली.
यानंतर, तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उडत आहे. अनेकांनी तिची लायकी व अक्कलच काढली आहे. स्वातंत्र्यसंग्रामात भाग न घेतलेली अशी मंडळी या लढ्याला बदनाम करू पाहत आहेत, असे लोकांनी म्हटले आहे.