..तर आमच्या वडापावच्या गाडीवरही 'ईडी' कारवाई करेल असे वाटते; संजय राऊतांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 18:35 IST2022-03-24T15:04:06+5:302022-03-24T18:35:57+5:30
आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

..तर आमच्या वडापावच्या गाडीवरही 'ईडी' कारवाई करेल असे वाटते; संजय राऊतांचा टोला
नागपूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून ईडी, आयकर विभागाकडून करावाईचं सत्र सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मला भीती वाटते की, आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल त्याचावरही ईडी कारवाई करेल, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना लगावला. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली व सभागृह चालू दिलं नाही. हे भाजपच एक धोरण, नीती आहे, लोकं याला बळी पडतात. मात्र, देशात खरी समस्या रशिया-युक्रेन, हिजाब, काश्मीर फाईल नाही, त्या तर राहतीलच पण बेरोजगारी आणि महागाई ही खरी समस्या असल्याचे राऊत म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणा ज्या सुडाच्या भावनेन राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. ते त्यापद्धतीनच काम करेल विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. जर आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
निल सोमय्यांच्या प्रकरणाबाबत विचारले असता, मी सरकारकडे काही पुरावे देण्याचं काम केलं. त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यात काही दम असेल तर पोलीस कारवाई करतील. माझा आणि सरकारचा दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे, असे राऊत म्हणाले.