जेईई मेन्स-२ परीक्षेत नागपूरचा मृणाल देशात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 08:43 PM2023-04-29T20:43:09+5:302023-04-29T20:43:52+5:30
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे निकाल शनिवारी घाेषित झाले. या परीक्षेत नागपूरचा विद्यार्थी मृणाल श्रीकांत वैरागडे या विद्यार्थ्याने ३०० पैकी ३०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात टाॅपर, तर देशातही तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे निकाल शनिवारी घाेषित झाले. या परीक्षेत नागपूरचा विद्यार्थी मृणाल श्रीकांत वैरागडे या विद्यार्थ्याने ३०० पैकी ३०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात टाॅपर, तर देशातही तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
एप्रिल महिन्याच्या ६, ८, १०, ११, १२, १३, १५ राेजी जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा झाली, ज्यामध्ये देशभरातून जवळपास ९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रातील निकालाप्रमाणे नागपूरसह विदर्भाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राच्या परीक्षेतही दमदार कामगिरी केली आहे. मृणाल वैरागडे या विद्यार्थ्याने सर्वाेत्तम रॅंक प्राप्त करीत देशात तिसरे रॅंक प्राप्त केले. विशेष म्हणजे पहिल्या व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याप्रमाणे ३०० पैकी ३०० गुण प्राप्त केले आहेत. मात्र, केवळ वय कमी असल्याने त्याला तिसरी रॅंक मिळाली.
यावेळी अखिल भारतीय स्तरावरही नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चांगली रॅंक प्राप्त केली आहे. या परीक्षेत जवळपास ५००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यातील ४८६३ विद्यार्थी ॲडव्हान्स परीक्षेसाठी क्वालिफाय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील ७ विद्यार्थी, पहिल्या ५०० मध्ये १८ विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त केले आहे. शेकडाे विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक पर्सेंटाईल प्राप्त केले आहे.
अभ्यासातील सातत्याने गाठता येते सर्वोच्च यश : मृणाल
पेपर पॅटर्नचे अवलाेकन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात वेळेचे नियाेजन करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास सर्वाेच्च यश नक्कीच गाठता येते, अशी भावना मृणाल वैरागडेने ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केली. मृणालने दहावीत सीबीएसई बाेर्डातून ९८.४ टक्के गुण प्राप्त केले हाेते. त्यानंतर बारावी राज्य बाेर्डातून केली. जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रातही त्याने ९९.९६ टक्के पर्सेंटाईल प्राप्त केले हाेते. आता पूर्ण फाेकस ॲडव्हान्स परीक्षेवर ठेवला असून, येथे चांगले गुण प्राप्त करून आयआयटी मुंबईच्या सीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. मृणालचे वडील श्रीकांत वैरागडे यांनीही त्याच्या मेहनतीचे काैतुक केले. मृणालने गेल्या दाेन वर्षांत एकाही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही व अभ्यासावर प्रचंड मेहनत घेतली. त्याचे फळ त्याला मिळाल्याची भावना श्रीकांत वैरागडे यांनी व्यक्त केली.