मृगनयनी प्रदर्शन : पतौडीचे वंशज, पाकीजाची कलाकृती अन् होळकरांचे कारागीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 10:37 PM2019-08-23T22:37:33+5:302019-08-23T22:41:29+5:30
भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.
मृगनयनी म.प्र. हस्तशिल्प आणि हातमाग विकास निगम व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘मृगनयनी मध्यप्रदेश प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मध्यप्रदेशातील पारंपरिक कलाकृतींना आकार देणाऱ्या कलावंतांचे वंशज त्यांच्या कलाकृतींसह सहभागी झाले आहेत. त्यात नवाब पतौडी यांची नात, पाकीजा चित्रपटात मीनाकुमारीने धारण केलेली चंदेरी साडी बनविणारे कलावंत, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी प्रोत्साहन दिलेल्या माहेश्वरी कलाकृतीच्या कारागिरांचे वंशज आणि अन्य अनेक व्यक्तिगत तसेच घरादाराला सौंदर्याने नटविणाऱ्या वस्तू सादर झाल्या आहेत. त्यात हस्तकौशल्याने बनिवलेल्या बॅग, पर्स, साड्या, खेळण्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. यात ७७ कलावंत सहभागी असून, पाच-सात कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
खिरवडकर यांच्या हस्ते उद्घाटन
दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. यावेळी, मृगनयनीचे एम.एल. शर्मा उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी असणाऱ्या सर्व वस्तू या कोणत्याही मशिनरीशिवाय बनविण्यात आल्या असून, या कलाकृतींचे देश-विदेशात प्रचंड मागणी असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
अडीच लाखाची चंदेरी साडी
या प्रदर्शनात दोन ते अडीच लाख रुपये किमतीच्या चंदेरी साड्या सादर करण्यात आल्या असून, यातील कलाकृती सोने आणि चांदीच्या तारांनी घडविण्यात आल्या आहेत. त्यात मुद्रा, महेश्वरी येथील मंदिरांच्या खिडक्यांमध्ये असलेल्या डिझाईन्स तंतोतंत साड्यांवर साकारण्यात आलेल्या आहेत.
बुद्धाचा संपूर्ण इतिहास दर्शविणारी मूर्ती
प्रदर्शनात बुद्ध, क्रिष्ण, महादेव शिवाच्या मूर्ती सादर करण्यात आल्या आहेत. बुद्धाच्या मूर्तीच्या पाठमोऱ्या भागात बुद्धाच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतचा चित्र इतिहास साकारण्यात आलेला आहे. यासोबतच, कृष्ण, महादेवाच्या मूर्तीच्या पाठमोऱ्या भागाला वेगवेगळ्या कलाकृतींचे दर्शन दिसून येते.
भोपाळची ओळख ‘जरी जर्दोजी’
खैनीच्या शौकिनांसाठी बनविण्यात आलेल्या ‘जरी जर्दोजी’ पिशव्या सादर आहेत. विशेष म्हणजे, या पिशव्या भोपाळची ओळख म्हणून प्रसिद्ध आहेत. नातू हमीद उल्ला खान नवाब पतौडी यांच्या नातीन फिरोजा-अफरोज या पिशव्या घेऊन आल्या आहेत. यासोबतदालिम्बी आणि अनारी गुलाबी या माहेश्वरी साड्यांचे कारागीर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अहमद हुसैन अंसारी व वसंत श्रवणेकर आले आहेत. ही या कारागिरीची सातवी पिढी आहे. यासोबतच, पाकीजा चित्रपटात मीनाकुमारी यांची साडी बनविणारे अब्दुल हकीम खलिफा आले आहेत.