‘मृत्युंजय’ अध्ययन झाला पाच वर्षांचा : प्रतिकूल परिस्थितीत मिळाले होते जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:00 AM2018-01-03T00:00:34+5:302018-01-03T00:02:14+5:30
आईच्या मृत्यूनंतर जन्म घेणारा ‘मृत्युंजय’ म्हणजे अध्ययन मोगरे. यंदा तो पाच वर्षांचा झाला. त्याचा पाचवा वाढदिवस सोमवारी रविनगरातील डॉ. दंदे हॉस्पिटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ३१ डिसेंबर २०१२ ची ती रात्र मोगरे कुटुंबासाठी काळ बनून आली. अख्खे शहर नवीन वर्षाच्या स्वागतात दंगलेले असताना स्ट्रेचरवर एक गर्भवतीला दंदे हॉस्पिटलला आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासले, ती केव्हाच गेली होती. तिच्या पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके मात्र अद्यापही सुरू होते. वेळ फार कमी होता. डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मृत्यूपश्चात शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढले. परंतु त्याला श्वास घेता येत नव्हता. लगेच विशेष उपचाराला सुरुवात केली आणि बाळाला जीवनदान मिळाले. आईच्या मृत्यूनंतर जन्म घेणारा ‘मृत्युंजय’ म्हणजे अध्ययन मोगरे. यंदा तो पाच वर्षांचा झाला. त्याचा पाचवा वाढदिवस सोमवारी रविनगरातील डॉ. दंदे हॉस्पिटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
पांढराबोडी येथील सारिका राजेश मोगरे (२२) त्या दुर्दैवी गर्भवतीचे नाव. ३१ डिसेंबरच्या रात्री तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. नातेवाईकांनी तिला महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून व इंजेक्शन देऊन घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतु घरी आल्यावर पुन्हा रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. यामुळे कुटुंबीयांनी सारिका हिला दंदे रुग्णालयात दाखल केले. डॉ. पिनाक दंदे व स्त्रीरोगततज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांना तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. परंतु डॉ. सीमा दंदे यांना तिच्या पोटात हालचाल जाणवली. त्यांनी तपासले असता पोटात ३८ आठवडे पूर्ण झालेले बाळ आढळून आले. अत्यंत अशक्यप्राय व दुर्मिळातील दुर्मिळ अशी ही घटना होती. डॉ. दंदे दाम्पत्याच्या नेतृत्वात पोस्टमार्टम सिझेरियन अर्थात मृत्यूपश्चात शस्त्रक्रिया करण्याचा तातडीचा निर्णय घेतला गेला. नातेवाईकांच्या संमतीनंतर मृत्यूपश्चात शस्त्रक्रिया करण्यात आली व बालकाने जन्म घेतला. परंतु त्या नवजात बाळाला श्वास घेण्यास अडचण जात होती. बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक यांनी तत्काळ विशेष उपचार केले. विविध अडचणींवर मात करून ते बाळ मृत्यूच्या दारातून बाहेर आले. दंदे हॉस्पिटल चमूने पेललेल्या आव्हानामुळे त्या बाळाला जीवनदान मिळाले. ही घटना घडली तेव्हा ती जागतिक स्तरावर दुर्मिळ घटना म्हणून चर्चेत आली होती.
विशेष म्हणजे, वर्ष होत नाही तोच त्या बाळाच्या वडिलांचा मृत्यू झाला. बाळाची जबाबदारी आजी-आजोबांवर आली. बाळाच्या आरोग्याची जबाबदारी घेतलेल्या डॉ. दंदे यांनी त्याच्या शाळेचीही जबाबदारी घेतली. ‘मृत्युंजय’चे नाव अध्ययन मोगरे ठेवून त्याला सरस्वती शाळेत प्रवेश मिळवून दिला. दंदे हॉस्पिटलच्यावतीने दरवर्षी अध्ययनचा वाढदिवस १ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या वर्षीही सोमवारी अध्ययनचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. दंदे यांनी त्याला सायकल विकत घेऊन देण्यासाठी त्याचे आजोबा कल्लू मोगरे यांना आर्थिक मदत केली. यावेळी अध्ययनच्या चेहºयावरील आनंद पाहून इतरांचाही आनंद आणखी द्विगुणित झाला.