महावितरणने कापले, आम आदमीने जोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:57+5:302021-03-16T04:08:57+5:30
नागपूर : थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकाचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या ...
नागपूर : थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकाचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते जोडण्याची मोहीम आंदोलनाच्या धर्तीवर आखली आहे. गाडगेनगर परिसरातील रमना मारोती रोडवरील एका ग्राहकाची कापलेली वीज आपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जोडली.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रमना मारोती रोडवरील मडावी हाऊसचा वीजपुरवठा कापला होता. कायदेशीर नोटीस न देता वीजपुरवठा कापण्यात आला होता, असा आपचा आरोप आहे. वीज उपभोक्ता घरमालक एकतृतीयांश रक्कम भरायला तयार असतानाही वीज कापण्यात आली. आपच्या कार्यकर्त्यांकडे ही तक्रार गेल्यावर त्यांनी कनेक्शन जोडले. रविकांत वाघ व प्रभात अग्रवाल यांच्यासह या मोहिमेत नागपूर संयोजक कविता सिंघल, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, पीयूष आकरे, कृतल वेलेकर, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, संजय अनासाने, धीरज आघाशे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.
लॉकडाऊनमुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. आर्थिक स्थिती खालावली आहे. तरीही राज्य सरकार लोकांकडून सक्तीने वीज बिल वसूल करीत आहे. याविरोधात हे आंदोलन असल्याचे शहर सचिव भूषण ढाकुलकर यांनी कळविले आहे.