नागपुरात महावितरणने कापली वीज : १६१६ घरांमध्ये अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:13 PM2021-02-11T22:13:51+5:302021-02-11T22:15:53+5:30
MSEDCL cuts off electricity आंदोलनांची कुठलीही पर्वा न करता महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. दररोज सरासरी ४०० पेक्षा अधिक थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. या अभियानांतर्गत चार दिवसांत १,६१६ ग्राहकांचे घर किंवा प्रतिष्ठान अंधारात बुडाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंदोलनांची कुठलीही पर्वा न करता महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. दररोज सरासरी ४०० पेक्षा अधिक थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. या अभियानांतर्गत चार दिवसांत १,६१६ ग्राहकांचे घर किंवा प्रतिष्ठान अंधारात बुडाले आहे.
महावितरणने सोमवारी थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम सुरू केली. कंपनीचे म्हणणे आहे की, आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोरोना संक्रमण काळात एकाही थकबाकीदार ग्राहकावर कारवाई करण्यात आली नाही. लोकांना केवळ बिल भरण्याची विनंती केली गेली. परंतु आता कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. चार दिवसांत १,६१६ कनेक्शन कापण्यात आले. या ग्राहकांकडे जवळपास ३.७० कोटी रुपयांचे बिल थकीत आहे.
कंपनी सध्या त्या ग्राहकांवर कारवाई करीत आहे, ज्यांनी एप्रिल २०२० पासून बिल भरलेले नाही. १,६१६ कनेक्शन कापल्यानंतरही नागपूर सर्कल (शहर व बुटीबोरी-हिंगणा) येथे जवळपास ६५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक कंपनीच्या निशाण्यावर आहेत. या ग्राहकांवर १६० कोटींपेक्षा अधिकची थकबाकी आहे. कंपनीतील सूत्रानुसार, दररोज ५०० पेक्षा अधिक कनेक्शन कापण्याची तयारी करण्यात आली आहे.
चार दिवसांत भरले तीन कोटी
महावितरणने कारवाई सुरू करताच थकबाकीदारांमध्ये खळबळ माजली. गेल्या चार दिवसांत थकबाकीदारांनी ३ कोटी रुपयांचे थकीत बिल भरून स्वत:ला कारवाईपासून वाचवले. बिल भरणाऱ्यांमध्ये १,५४६ घरगुती ग्राहकांसह एकूण २,२०५ ग्राहकांचा समावेश आहे.