महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत : ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना मागेल तेव्हा तात्काळ वीज जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:55 PM2021-05-03T23:55:00+5:302021-05-03T23:56:33+5:30
MSEDCL Oxygen project राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील १० मोठ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीज जोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांनादेखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील १० मोठ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीज जोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच आतापर्यंत ३५ कोविड रुग्णालयांनादेखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविडबाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरात तब्बल १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच राज्यात ऑक्सिजन निर्मितीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. ऑक्सिजन प्रकल्पांची तातडीने क्षमतावाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे.