महावितरणचा शॉक, ६० ग्राहकांचे कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:19+5:302021-02-11T04:10:19+5:30

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा ...

MSEDCL shocked, 60 customers disconnected | महावितरणचा शॉक, ६० ग्राहकांचे कनेक्शन कापले

महावितरणचा शॉक, ६० ग्राहकांचे कनेक्शन कापले

Next

भिवापूर : कोराना काळात उत्पन्नाची साधने ठप्प पडली. रोजगार बुडाला आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले. त्यामुळे अनेकांनी विद्युत बिलाचा भरणा केला नाही. आठवडाभरापूर्वी महावितरणने विद्युत बिल भरा, अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा अल्टिमेटम दिला. त्यानुसार (दि. १०) भिवापूर तालुक्यातील तब्बल ६० जणांचा (ग्राहकांचा) घरगुती विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. तालुक्यात घरगुती विद्युत ग्राहकांची संख्या १७,०४६ इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांनी सर्वप्रथम पोटाची खळगी भरण्याला प्राथमिकता दिली. यादरम्यान रीडिंग न घेता सरासरी पाठविलेल्या विद्युत बिलांमुळे थकीत रकमेचा आकडा फुगत गेला. या काळात तालुक्यातील थकीत रकमेचा हा आकडा ३.५१ कोटीवर पोहोचला. शासनाच्या भूलथापांना बळी पडत, अनेकांनी उधारवाडीतून थकीत बिलाची काहीअंशी रक्कम भरली. मात्र अद्यापही अनेक ग्राहकांकडे विद्युत बिल थकीत असून बिल भरण्याची त्यांची कुवत नाही. कारण लॉकडाऊननंतर अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच महावितरणने पंधरवड्यापूर्वी थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले तर, काहींना मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून बिल भरण्याच्या सूचना केल्या. १५ दिवसाच्या आत थकीत रकमेचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशाराही नोटिसीतून दिला होता. मात्र ज्यांना दोनवेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे अशा अनेकांना विद्युत बिलाचा भरणा करणे अद्यापही शक्य झाले नाही. दरम्यान, महावितरणने नोटीस पाठविलेल्या थकीत विद्युत बिल ग्राहकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली. यात भिवापूरसह तालुक्यातील ६० वर नागरिकांचा घरगुती विद्युत पुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात महावितरण विरोधात असंतोष खदखदत आहे.

४,२३७ ग्राहकांना नोटीस

तालुक्यात १७,०४६ ग्राहक असून यातील थकीत बिल असलेल्या ४,२३७ ग्राहकांना महावितरणने लेखी व एसएमएसद्वारे नोटीस पाठविले आहे. या ग्राहकांकडे थकीत विद्युत बिलाचा आकडा २ कोटी ३३ लाख रुपये आहे. सद्यस्थितीत यातील ६० वर ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

--

महावितरणने थकीत विद्युत बिल ग्राहकांना नोटीस पाठविले आहे. १५ दिवसाच्या आत थकीत रक्कम भरण्याचे सुचविले आहे. मात्र त्यानंतरही थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाचा १ फेब्रुवारीपासून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. ग्राहकांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही. मात्र देयकाचा भरणा होत नसल्यामुळे ग्राहकांवर थकीत रक्कम वाढत आहे. परिणामी आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

दामोधर उरकुडे

उपकार्यकारी अभियंता, महावितरण, भिवापूर

-

लॉकडाऊन संपले असले तरी रोजगाराची परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. अशात गोरगरीब, गरजूच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून त्यांना अंधारयातना देणे योग्य नाही. जवराबोडी येथील विलास बांते हे दूधविक्रीच्या अल्पमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केला. बांते यांनी एक दिवसाची मुदत मागितली होती. मात्र काहीएक न ऐकता कारवाई करण्यात आली. आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या ऊर्जामंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महावितरणची ही कारवाई निषेधार्ह आहे.

रोहित पारवे,

जिल्हा महामंत्री, भाजपा युवा मोर्चा

Web Title: MSEDCL shocked, 60 customers disconnected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.