महावितरणमधील कोरोनाबाधितांचे वेतन कापणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:52+5:302021-05-26T04:08:52+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाच्या कालावधीत अबाधित वीज पुरवठ्यासाठी कार्यरत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना आता कोरोनावरील उपचारासाठी सुटी घेतल्यास वेतन मिळणार ...
नागपूर : कोरोना संसर्गाच्या कालावधीत अबाधित वीज पुरवठ्यासाठी कार्यरत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना आता कोरोनावरील उपचारासाठी सुटी घेतल्यास वेतन मिळणार आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही घोषणा केली. कोरोनाबाधित झाल्यावर सुटी घेतल्यास कुणाचेही वेतन कापणार नाही. तसेच कंपनीच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर खरेदीसाठी एक हजार रुपये देण्यात येतील.
कोरोनामुळे इस्पितळात दाखल झाल्यावर ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यात येईल. जर कर्मचारी होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईन केंद्रावर असेल तर ही रक्कम २५ हजार इतकी असेल. कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान व विम्याच्या २० लाखांच्या रकमेसह एकूण ५० लाख रुपये देण्यात येतील. कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्यांसोबतच आऊटसोर्सिंग करण्यात आलेले कर्मचारी व सुरक्षारक्षकांनादेखील सानुग्रह अनुदान देण्यात येईल.