थकबाकी वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 09:19 PM2021-06-25T21:19:56+5:302021-06-25T22:28:28+5:30
Mahavitran वीज ग्राहकांवर थकीत बिलाची रक्कम वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी थकीत रकमेची वसुली मोहीम अधिक व्यापक करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज ग्राहकांवर थकीत बिलाची रक्कम वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी थकीत रकमेची वसुली मोहीम अधिक व्यापक करण्याचे निर्देश दिले आहेत.
महावितरणचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी नुकतीच थकीत रकमेच्या वसुलीबाबत समीक्षा बैठक घेतली. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात महावितरणने ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली. परंतु या काळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषी ग्राहकांवर विजेची थकबाकी झपाट्याने वाढली. त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थितीवर पडला आहे. अशा थकबाकीदारांसाठी वसुली आणखी व्यापक करून नियोजनबद्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पैसे न भरल्यास वीज कापण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले. बैठकीला मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, अमित परांजपे, डॉ. सुरेश वानखेडे उपस्थित होते.
ग्राहकांची आर्थिक स्थिती बिकट
खंडाईत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोहीम सुरू करण्याचा सल्ला देताना सांगितले की, कंपनीला हे माहीत आहे की कोरोनामुळे ग्राहकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. परंतु नागरिकांनी बिल न भरल्यास कंपनीला दैनंदिन खर्च उचलणे कठीण होणार आहे. त्यांनी परिस्थिती पाहून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.