२.६९ लाख ग्राहकांना महावितरणची ‘एसएमएस’ सुविधा
By admin | Published: June 15, 2017 04:24 PM2017-06-15T16:24:18+5:302017-06-15T16:24:18+5:30
ग्राहकांना मीटर रिडिंग, वीज बिल, खंडित वीजपुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती मोबाइलवर एसएमएसव्दारे प्राप्त होत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यवतमाळ व अमरावती या दोन जिल्ह्यांतील २ लाख ६९ हजार ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्याने या ग्राहकांना मीटर रिडिंग, वीज बिल, खंडित वीजपुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती मोबाइलवर एसएमएसव्दारे प्राप्त होत आहे.
यापूर्वी ही माहिती फक्त इंग्रजी भाषेत एसएमएसव्दारे मिळायची. मात्र, महावितरणचे ग्रामीण भागातील ग्राहक लक्षात घेता आता वीज ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार इंग्रजी व मराठी भाषेत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार होताच तत्काळ संबंधित ग्राहकांच्या मोबाइलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तारीख याची माहिती मिळते. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रिडिंग अशा प्रकारची माहिती वीज ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर खंडित वीजपुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरू होण्याची वेळ याची माहितीदेखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार आहे. त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाइल अॅपद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहे. त्यामुळे ग्राहकाला देयकाचा आॅनलाइन भरणा करता येणार आहे. मोबाइल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व इतर माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे, त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणे गरजेचे असल्याने महावितरणकडे नोदणी करावी, असे आवाहन अमरावती परिमंडळाव्दारा करण्यात आले आहे.
अशी करा नोंदणी
वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये एमआरईजीएस हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा संख्येचा ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवावा याशिवाय १८००२३३३४५, १८००२००३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येईल, महावितरणचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अॅपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.