नागद्वार पचमढी यात्रेसाठी विशेष एसटी बससेवा; असं आहे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 06:25 PM2022-07-23T18:25:32+5:302022-07-23T18:26:07+5:30

केवळ ३८५ रुपयांत प्रवास, दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध

MSRTC to operate Special ST bus service for Nagdwar Pachmarhi Yatra from 23 july | नागद्वार पचमढी यात्रेसाठी विशेष एसटी बससेवा; असं आहे वेळापत्रक

नागद्वार पचमढी यात्रेसाठी विशेष एसटी बससेवा; असं आहे वेळापत्रक

Next

नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध नागद्वार पचमढी यात्रेसाठी एसटीच्या विशेष बसेस शनिवारपासून चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन करण्यासाठी एसटी महामंडळाने थेट पंढरपूर यात्रा विशेष बससेवा दिली. आता नागद्वार यात्रेचीही व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांचे खास आकर्षण असलेली नागद्वार यात्रा आता सुरू होत आहे. नागद्वारमध्ये गोविंदगिरी पहाडावर मुख्य गुहेत शिवलिंग असून या शिवलिंगाला काजळ लावल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच नागमोडी वळणातून नागद्वारची कठीण यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष दूर होतो, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणात रिमझिम पावसात या यात्रेला भाविक मोठ्या संख्येत भक्तिभावाने सहभागी होतात. ते लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नागद्वार यात्रेचे नियोजन केले असून गणेशपेठ बसस्थानकावरून २३ जुलैच्या सायंकाळी ५ वाजतापासून दर अर्ध्या तासाने बस पचमढीसाठी निघणार आहे. पचमढी नागद्वार यात्रा करणाऱ्या भाविकांना केवळ ३८५ रुपयांत प्रवास करता येणार आहे. याशिवाय किरकोळ स्वरूपाचा अतिरिक्त यात्रा कर प्रवाशांना द्यावा लागणार आहे.

नागपूर ते पचमढी बसेसची वेळ

२३ जुलैला पहिली बस सायंकाळी ५.३० वाजता आणि त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासानंतर रात्री १० वाजतापर्यंत बसस्थानकावरून पचमढीसाठी प्रवाशांना घेऊन बस निघणार आहेत. त्याचप्रमाणे परतीसाठी भाविकांना पचमढी ते नागपूर असा प्रवास करण्यासाठी पचमढी यात्रा स्थानकावर दुपारी ३ वाजतापासून ६ वाजतापर्यंत दर एक तासाने आणि नंतर सायंकाळी ६.३० वाजतापासून रात्री १० वाजतापर्यंत प्रत्येक अर्धा ते एक तास अंतराने प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार बस धावणार आहेत. महामंडळाच्या या सुविधेमुळे नागपूर आणि आजूबाजूच्या गावांतील भाविकांना नागद्वार यात्रा दर्शन घेता येणार आहे.

Web Title: MSRTC to operate Special ST bus service for Nagdwar Pachmarhi Yatra from 23 july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.