एमटीडीसीतर्फे ‘पर्यटन दिना’ची तयारी
By admin | Published: September 26, 2014 01:15 AM2014-09-26T01:15:52+5:302014-09-26T01:15:52+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एमटीडीसीसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर
महाविद्यालयांचा सहभाग : विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एमटीडीसीसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील पर्यटन विभाग, एलएडी महाविद्यालय, तुली कॉलेज, तिरपुडे कॉलेज व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पर्यटन विभागाचा सक्रिय सहभाग राहणार असल्याची माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक वरिष्ठ महाव्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसीचे पर्यटन निवास येथे कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला अलायन्स इन्फोस्पेस अकॅडमीचे संचालक जयदीप दास, वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे व हनुमंत हेडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
दरम्यान जयदीप दास ‘जबाबदार पर्यटन आणि समूह विकासात सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विलास काळे ‘पर्यटन आणि समूह विकास’ या संकल्पनेवर बोलतील. या कार्यक्रमात सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांसाठी ‘पर्यटन आणि समूह विकास’ या विषयावर छायाचित्र आणि सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून, त्यांचा गौरव केला जाईल. असेही हेडे म्हणाले.
दुसरीकडे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून एमटीडीसीच्यावतीने २७ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी विदर्भातील ताडोबा, चिखलदरा, मेळघाट, नागझिरा व पेंच सिल्लारी येथे जाण्या-येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे हेडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पर्यटन विभागाच्या प्रमुख लक्ष्मी रमण, एलएडी कॉलेच्या जोत्स्ना पाटील व चारुलता गजभिये उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)