एमटीडीसीच्या ‘माईन’ पर्यटनासाठी रांगा!
By admin | Published: January 20, 2017 02:26 AM2017-01-20T02:26:28+5:302017-01-20T02:26:28+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपुरात प्रथमच ‘माईन टुरिझम’ सुरू केले आहे.
पहिलाच प्रयोग : सहलीसाठी १९ पर्यटकांचे बुकिंग
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपुरात प्रथमच ‘माईन टुरिझम’ सुरू केले आहे.
एमटीडीसीच्या या प्रयोगाला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, २९ जानेवारी रोजी सावनेर तालुक्यातील गोंडेगाव येथे जाणाऱ्या सहलीसाठी तब्बल १९ पर्यटकांनी बुकिंग केले असल्याची माहिती एमटीडीसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
‘माईन टुरिझम’ या सहलीचे मागील १७ डिसेंबर २०१६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल सुद्धा उपस्थित होते. यानंतर पुढील २९ जानेवारी २०१७ रोजी गोंडेगाव येथील माईन पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली सहल रवाना होणार आहे.
या सहलीविषयी पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सूकता असून, एमटीडीसीने जय्यत तयारी केली आहे. एमटीडीसीने या सहलीसाठी वातानुकूलीत सुसज्ज अशी बस तयार केली आहे. ही बस २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसीच्या कार्यालयापासून सुटेल. यानंतर सकाळी १०.३० वाजता बस आदासा येथे पोहोचेल. येथे सकाळी ११ वाजतापर्यंत गणपतीचे दर्शन घेतले जाईल. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता बस ही ईको पार्क येथे पोहोचेल. येथूनच सर्व पर्यटक डब्ल्यूसीएलच्या गेस्ट हाऊसवर जातील. येथे माईन्स पाहण्यासाठी ड्रेस व शूज बदलविले जाईल. यानंतर दुपारी १२ वाजता डब्ल्यूसीएलची अंडरग्राउंड माईन्स पाहण्याचा कार्यक्रम सुरू होईल. शिवाय यानंतर दुपारी १.३० वाजता जेवणाचा कार्यक्रम आटोपून दुपारी २.३० वाजता एमटीडीसीची बस पुन्हा नागपूर येथे पोहोचेल.(प्रतिनिधी)
‘नागपूर दर्शन’ला अल्प प्रतिसाद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘माईन’ टुरिझमसोबतच मागील महिन्यात नागपूर दर्शनाचा प्रयोग सुद्धा राबविला. परंतु एमटीडीसीच्या या ‘नागपूर दर्शन’ सहलीला फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. एमटीडीसीने प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवारी ‘नागपूर दर्शना’ ची योजना आखली आहे. परंतु या सहलीसाठी पर्यटकच मिळत नसल्याने एमटीडीसीचा हा प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे.