मुबारक बेगम जगताहेत उपेक्षेचे जीवन
By admin | Published: May 24, 2016 02:43 AM2016-05-24T02:43:50+5:302016-05-24T02:43:50+5:30
एकेकाळी आपल्या गोड गळ्याने रसिकांना भुरळ घालणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम आज अंथरुणावर पडल्या आहेत.
बॉलिवूड कलावंतांची पाठ : यशवंत बाजीराव यांचा मदतीचा हात
नागपूर : एकेकाळी आपल्या गोड गळ्याने रसिकांना भुरळ घालणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम आज अंथरुणावर पडल्या आहेत. भारतीय संगीताला गोड गळ्याची श्रीमंती देणाऱ्या मुबारक बेगम आज मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपेक्षेचे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उपचार करायलाही पैसे नाहीत. अशा वेळी नागपुरातील त्यांच्या एका चाहत्याने मदतीचा हात पुढे केला आहे.
माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी नुकतेच मुबारक बेगम यांच्या मुंबईच्या जोगेश्वरी, बेरमबाग येथील घरी जाऊन त्यांना आर्थिक मदत केली. डॉ. बाजीराव स्वत: संगीतकार आहेत व ते मुबारक बेगम यांचे चाहतेही आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबाबत त्यांनी वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांनी लगेच मुंबई गाठली आणि पत्ता काढत मुबारक बेगम यांचे घर गाठून त्यांची भेट घेतली.
बाजीराव यांनी बेगम यांना नुसतीच मदत केली नाही तर त्यांच्या आमदार पेन्शनमधून दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचे वचनही दिले आहे. डॉ. बाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुबारक बेगम यांचा मुलगा प्रकृतीने लाचार आहे. त्यांची नात एका दुकानात कामाला जाऊन घराचा गाडा चालविते. सुन व नात त्यांची सेवा करतात, हे विशेष. काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचाराचे पैसे द्यायलाही कुटुंबीयाजवळ पैसे नव्हते. कुटुंबीयांनी बॉलिवूडच्या अनेक कलावंतांना मदत मागितली. यावेळी लता मंगेशकर यांनी त्यांना मदत केल्याचे बाजीराव यांनी सांगितले. मात्र इतर कोणत्याही कलावंताने त्यांना मदतीसाठी हात पुढे केला नाही.
‘कभी तनहाईयो मे यूं हमारी याद आयेगी...’, ‘तुझको अपने गले लगा लूं ऐ मेरे हमराही...’ अशा काही अजरामर गीतांनी मुबारक बेगम यांनी हिंदी चित्रपट संगीताला श्रीमंत केले आहे. आपल्या गोड आवाजाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मुबारक बेगम आज ८० वर्षांच्या आहेत आणि आयुष्याच्या यावेळी त्यांना ही वेळ पाहावी लागत आहे. त्यांची गाणी आजही कर्णमधूर आहेत, मात्र अजरामर गाणी गाणाऱ्या मुबारक बेगम यांच्याकडे बॉलिवूड कलाकारांनीच पाठ फिरविली, असे दु:खाने म्हणावे लागते. (प्रतिनिधी)