२०२३ मध्ये अंतराळात बरेच काही; उल्का वर्षाव हाेईल, पृथ्वीजवळून धुमकेतूही जातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 08:00 AM2023-01-01T08:00:00+5:302023-01-01T08:00:07+5:30
Nagpur News २०२३ मध्ये ११ उल्का वर्षावासह ब्ल्यू मूल, सुपरमून आणि मायक्राेमून पाहण्याची संधी नागरिकांना मिळेल. साेबत पृथ्वीजवळून जाणाऱ्या धुमकेतूचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : अवकाशातील घडामाेडी प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय असताे. खगाेलप्रेमींसाठी या घटना अभ्यासाची माेठी संधी ठरते. ही संधी यावर्षीही मिळणार असून वेगवेगळ्या घटनांची मेजवानीच अनुभवता येणार आहे. यावर्षी दाेनदा सूर्यग्रहण हाेईल; पण भारतातून दिसणार नसल्याने निराशा येईल. मात्र खग्रास आणि खंडग्रास असे दाेनदा चंद्रग्रहण अनुभवता येईल. याशिवाय ११ उल्का वर्षावासह ब्ल्यू मूल, सुपरमून आणि मायक्राेमून पाहण्याची संधी नागरिकांना मिळेल. साेबत पृथ्वीजवळून जाणाऱ्या धुमकेतूचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
हे वर्ष अंतराळातील नयनरम्य घडामाेडी अनुभवण्याचे असेल. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ३ व ४ जानेवारीला ताशी ४० उल्का बघायला मिळतील. शिवाय १२ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत जवळ असलेल्या शेकडाे धुमकेतूंपैकी एक धुमकेतू पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. जानेवारीलाच मंगळ व चंद्र युती आणि मंगळ व बुध ग्रहाची युती हाेईल व दाेन्ही वेळा चंद्र एका ग्रहाला झाकेल. ग्रहांच्या अनेकवेळा युती यावर्षीही हाेतील. आकाशात पृथ्वीजवळून जाणाऱ्या २३०४ अशनी आहेत. यातील काही अशनी पृथ्वीजवळून जाणार आहेत. याशिवाय ११ वेळा उल्का वर्षाव हाेतील. तीन मायक्रो मून, एक सुपरमून आणि एक ब्लुमून दिसणार आहे. एकूण खगोल अभ्यासकांना अनेक बाबींचे निरीक्षण या काळात करता येणार आहे.
अशा आहेत काही खगोलीय घटना
- २० एप्रिलला खंडग्रास सूर्यग्रहण आणि १४ ऑक्टाेबरला कंकणाकृती सूर्यग्रहण हाेईल. मात्र दाेन्ही भारतात दिसणार नाही.
- ५ व ६ मे राेजी छायाकल्प चंद्रग्रहण अस्पष्ट दिसेल आणि २८ व २९ ऑक्टाेबरला खंडग्रास सूर्यग्रहण स्पष्ट दिसेल.
- ६ जानेवारी, ५ फेब्रुवारी व १६ ऑगस्टला मायक्राे मून असेल. पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर जाणार असल्याने चंद्र अतिशय लहान दिसेल.
- २ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ असल्याने ताे अधिक तेजस्वी दिसेल. याला सुपरमून म्हणतात.
- ३० व ३१ ऑगस्टला ब्ल्यू मून सुपरमून बघायला मिळणार आहे.
- ११ वेळा उल्का वर्षाव : ३ व ४ जानेवारी, २२, २३ एप्रिल, ६, ७ मे, २८, २९ जुलै, १२, १३ ऑगस्ट, ७ ते ९, २१, २२ ऑक्टोबर, ४, ५, १७ व १८ नोव्हेंबर, तर १३, १४, २२ आणि २३ डिसेंबरला हा उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे.
- २० जानेवारीला पहिली २० मीटरची अशनी पृथ्वीजवळून जाणार आहे. १७ फेब्रुवारी, ३१ मे, १० जून, ४ जुलै, १७ सप्टेंबर आणि १२ नोव्हेंबरला विविध आकाराच्या अशमी पृथ्वीजवळून जातील.
इस्राेच्या अवकाश माेहिमा
- जुलै-ऑगस्टला इस्राेचे गगनयान-३ प्रक्षेपण
- जूनमध्ये चंद्रयान-३ प्रक्षेपण
- २४ डिसेंबर निसार उपग्रह प्रक्षेपण
- वर्षाअखेर मंगळयान-२, शुक्रयान-१ व ॲस्त्राेसॅट-२ चे प्रक्षेपण.