मजीप्राकडून गढूळ पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:13+5:302021-02-05T04:39:13+5:30
कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महादुल्याला पुरविल्या जाणाऱ्या पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष ...
कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महादुल्याला पुरविल्या जाणाऱ्या पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष उषा शाहू यांनी नगरपंचायतीकडे केली आहे. या संदर्भात नगराध्यक्ष राजेश रंगारी यांना दिलेल्या निवेदनात संभाजीनगर या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जाणारा पाणीपुरवठा हा दूषित व अशुद्ध असून, याबाबत चौकशी करावी, मजीप्रावर पाणीपुरवठा संदर्भात नगरपंचायतीने नियंत्रण ठेवावे व शुद्ध पाणी देण्यासंदर्भात मजीप्राला ताकीद द्यावी, अशी मागणी केली आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग व क्लोरिन गॅसचा पर्याप्त पुरवठा न करणे, तसेच पाण्यातील गाळ कमी करण्यासंदर्भात परिपक्व यंत्रणा नसणे आदी बाबतीत लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात राजेश रंगारी यांनी मजीप्राच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून, यावर तत्काळ कार्यवाही करावी व सर्वांना शुद्ध पाणी दिले जाईल, याची खात्री करावी, असे आदेश दिले आहेत. मजीप्राकडून मात्र अशुद्ध पाण्याचा इन्कार करण्यात आला आहे. मजीप्राच्या दर पंधरा दिवसांनी पाण्याची टीडीएस व इतर तपासणी केल्या जात असल्याचे सांगितले असून, या महिन्यात १ व १९ रोजी तपासणी झाली असून, पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.