‘मुजोर’ अधिकारी, हतबल सत्ताधारी! सलग चौथ्या दिवशी ‘आपली बस’ सेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:28 PM2018-09-25T21:28:24+5:302018-09-25T21:42:13+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्तापक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व परिवहन समितीचे सभापती यांनी केलेले प्रयत्नही अपुरे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सलग चौथ्या दिवशी मंगळवारी ‘आपली बस’ची सेवा बंद होती. परिणामी, अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारापुढे सत्तापक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व परिवहन समितीचे सभापती यांनी केलेले प्रयत्नही अपुरे पडले आहेत.
महापालिकेचा वित्त विभाग तिजोरीत पैसे नसल्याचे कारण पुढे करून आपली जबाबदारी टाळत आहे. तीन रेड बस आॅपरेटरचे ४५ कोटी रु. थकीत असल्याने यांच्याकडे डिझेल भरण्यासाठी पैसे नाहीत. जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली सत्तेत आलेली भाजपा व नागरिकांचा खिसा खाली करणारी महापालिका नागरिकांना मूलभूत गरज असलेली परिवहन सेवा उपलब्ध करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे गेल्या शनिवारपासून ३२० बसेसची चाके थांबलेली आहेत.
परिवहन विभागाला सापत्न वागणूक मिळत असल्याने या विभागाची अवस्था बिकट झाली आहे. स्थायी समितीने आपल्या अर्थसंकल्पात वित्त वर्षात परिवहन विभागासाठी १०८ कोटी देण्याची घोषणा केली आहे. तोटा भरून काढण्यासाठी दर महिन्याला परिवहन विभागाला नऊ कोटी मिळाले पाहिजेत. परंतु घोषणेनुसार निधी उपलब्ध करण्यात स्थायी समितीला अपयश आले आहे. परिवहन विभागाविषयी अनास्था असल्याने आज बससेवा बंद आहे. दुसरीकडे वीज, पाणी व कचरा यावर नियमित खर्च केला जात आहे. परंतु परिवहन विभागाचे बिल गेल्या चार महिन्यापासून थकीत आहे.
प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे व वित्त विभागाचा प्रभार सांभाळत असलेले उपायुक्त नितीन कापडणीस यांची भूमिका बस बंद पडण्याला थेट कारणीभूत असल्याचे दिसते. शुक्रवारी आयबीटीएम आॅपरेटला ९० लाखाचे बिल देण्यात आले. परंतु शहर बस चालविणाऱ्या बस आॅपरेटरला गेल्या आठवड्यात बिल दिलेले नाही. नवीन आठवड्याला सुरुवात होऊन दोन दिवस झाले तरी तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेतलेला नाही. महापालिका प्रशासन व आॅपरेटर यांच्यात सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. आॅपरेटर्सनी प्रत्येकी दोन कोटी घेऊ न बस सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु महापालिकेच्या खात्यात रक्कम नसल्याने अडचण असल्याचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले.
दररोज २० लाखांचे नुकसान
बस बंद असल्याने परिवहन विभागाला तिकिटातून दररोज होणारे १८ ते २० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याने बस बंद ठेवण्याचा निर्णय आॅपरेटरने घेतला. मिळालेल्या माहितीनुसार बस आॅपरेटर्सकडे आॅईल कंपन्यांची ६५ लाखांहून अधिक थकबाकी आहे. दोन ते तीन दिवस क्रेडिटवर संबंधित कंपन्याकडून डिझेलचा पुरवठा केला जातो.
नागरिकांना सेवा देण्यात मनपाला अपयश
परिवहन सेवा नफा कमावण्यासाठी नाही तर गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी चालविली जाते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत अनेकदा करून महापालिका अधिकाऱ्यांना बससेवा सुरळीत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी नफा कमावण्याचा विचार न करता शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याऐवजी बससेवा बंद ठेवली आहे.
...तर महापालिकेने दिवाळे घोषित करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सत्ता असूनही नागपूर शहराची अशी बिकट अवस्था असेल तर भविष्यात कोणती परिस्थिती निर्माण होईल, हे तर देवच जाणो, बस आॅपरेटरला थकबाकी न मिळाल्याने गेल्या चार दिवसापासून शहर बस बंद आहे. याची चर्चा आता राष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महापालिकेची अशी अवस्था असेल तर दुसऱ्या शहरांची कल्पना न केलेली बरी. सत्तेत आल्यानंतर महापालिका सांभाळता येत नसेल तर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महापालिका दिवाळखोरीत निघाल्याची घोषणा करावी.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते
गेल्या शनिवारपासून आपली बस सेवा बंद असल्याने नागपूर शहर व परिसरात विद्यार्थी व प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्रस्त झालेले आहेत. आॅटोचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. दहा रुपयाऐवजी २० ते २५ रुपये वसूल करीत आहे. त्यातच बस स्थानकावर आॅटोची प्रतिक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत तर नोकरदारांना कार्यालयात पोहचायला उशिर होत आहे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी बस बंद असल्याने शाळा -महाविद्यालयात जाणे बंद केले आहे.
आजपासून बस सेवा सुरळीत
शहर बस सुरळीत सुरु व्हावी. यासाठी अखेर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मंगळवारी हस्तक्षेप केला. मिळालेल्या माहितीनुसार तोडगा काढण्यासाठी जोशी, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, उपायुक्त नितीन कापडणीस व आॅपरेटरचे प्रतिनिधी यांच्यात रात्रीपर्यंत बैठक सुरू होती. यात थकबाकीवर तोडगा काढण्यासाठी नवीन फार्मूल्यावर चर्चा झाली. त्यानुसार आॅपेरटला प्रत्येकी २ कोटी देण्यात येणार आहे त्यानंतर २९सप्टेंबरला प्रत्येकी ५० लाख, ३ आॅक्टोबरला ५० लाख व ९ आॅक्टोबरला प्रत्येकी ५० लाख देण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून आपली बस सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.