रेल्वेत मुकबधीर गर्भवतीला कळा; ‘आरपीएफ’ची मदत, प्रसुती सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:57 PM2024-05-21T20:57:16+5:302024-05-21T20:58:18+5:30

दिव्यांगांच्या कोचमध्ये महिला तळमळत होती : आरपीएफने दाखवली तत्परता; माता-शिशू दोघेही स्वस्थ.

Mukbadhir found pregnant in the train Help of RPF easy delivery | रेल्वेत मुकबधीर गर्भवतीला कळा; ‘आरपीएफ’ची मदत, प्रसुती सुलभ

रेल्वेत मुकबधीर गर्भवतीला कळा; ‘आरपीएफ’ची मदत, प्रसुती सुलभ

 नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) राबविण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन मातृशक्ती' अंतर्गत धावत्या रेल्वे गाडीत प्रसवपिडेने तळमळत असलेल्या एका मुकबधित महिलेला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात दिला. त्यामुळे तिची प्रसुती सुलभ होण्यास मदत झाली. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याने मदत करणाऱ्या महिला-पुरूष आरपीएफ जवानांचे सर्वत्र काैतुक होत आहे.

घटना महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आहे. सोमवारी ही गाडी गोंदियाहून नागपूरकडे येत असताना दिव्यांगाच्या कोचमध्ये बसलेली एक मुकबधिर गर्भवती महिला प्रसवकळेमुळे तळमळू लागली. कुणीतरी ही माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर कळवली. त्यानंतर ती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना कळली. ही गाडी काही वेळेतच कामठीला पोहचणार होती. ते लक्षात घेऊन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंंद्र आर्य यांनी सहायक आयुक्त विनोद लांजीवार यांच्या मार्फतीने 'ऑपरेशन मातृशक्ती' राबविणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने पीडित महिलेच्या मदतीला धावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामठी स्थानकावर आरपीएफच्या महिला अंमलदार पिज्मा शर्मा आणि उपनिरीक्षक विजय भालेकर यांनी गाडी कामठीच्या फलाट क्रमांक १ वर थांबताच पीडित महिलेला अलगद उचलून फलाटावरून वाट काढत बाहेर आणले. लगेच एक ऑटो बोलवून त्या महिलेला कामठीच्या रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल होताच या महिलेले एका शिशूला जन्म दिला. तिची आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे. आरपीएफकडून तात्काळ मायेची उब लाभल्यानेच हे सर्व व्यवस्थित होऊ शकले. दरम्यान, पीडित महिलेला दोन्ही हातात उचलून आरपीएफच्या पिज्मा शर्मा आणि विजय भालेकर धावत-धावत स्थानकाबाहेर जात आहेत, ऑटो बोलवून त्यात तिला रुग्णालयाकडे नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हापासून त्यांच्यावर चोहोबाजूने स्तुतीसुमने उधळली जात आहे.
 
भाषेवर भावनांची मात
मुकबधिर असल्याने या महिलेला तिच्याशी संबंधित सविस्तर माहिती देता येत नव्हती. मात्र, डॉक्टर आणि आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला तिच्याकडून संकेतासंकेताने बरिचशी माहिती काढून घेतली. तिच्याजवळ एक आधारकार्ड होते. त्यावरच्या फोटोवरून ते तिचेच असावे आणि तिचे नाव विमला तेलम असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, आरपीएफने तिच्या पतीलाही शोधून काढले असून, तोसुद्धा दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Mukbadhir found pregnant in the train Help of RPF easy delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर